क्रीडा, सौजन्य-
एकदा ठेच लागल्यानंतर शहाणा माणूस पुढचे पाऊल टाकताना काळजी घेतो. कुस्ती संघटकांना हे तत्त्व माहीत नसावे. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतून कुस्ती हद्दपार होण्याची वेळ आली होती. कुस्तीचे नशीब चांगले असल्यामुळे कुस्तीचे अस्तित्व टिकले. कुस्ती संघटक त्यापासून काही बोध घेतील का?
ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतून कुस्ती हद्दपार झाली असती तर त्याचे कुस्ती क्षेत्रावर किती गंभीर परिणाम झाले असते याचा कधीही बारकाईने विचार आपल्या संघटकांनी केलेला नाही. कुस्तीच्या संयोजनात व्यावसायिकतेचा अभाव व राजकीय हस्तक्षेपाचा अतिरेक, बेशिस्त संयोजन, स्पर्धेस होणारा विलंब आदी कारणे त्यासाठी देण्यात आली होती. युरोपियन व आशियाई देशांच्या संघटकांनी आपली सारी शक्ती पणास लावल्यामुळे कुस्तीला ऑलिम्पिकमधून वगळण्याचे धाडस ऑलिम्पिक संघटकांना करता आले नाही. आता जरी कुस्ती शाबूत राहिली असली तरी आणखी आठ वर्षांनी काय बदल होतील हे सांगणे अवघड आहे. त्यामुळेच कुस्तीगिरांनी परिस्थितीनुसार बदल करण्याची आवश्यकता आहे. या बदलांची सुरुवात त्यांनी घरच्या मैदानापासून म्हणजेच महाराष्ट्र केसरी स्पर्धेपासून केली पाहिजे.
महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती स्पर्धेस राज्यात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे. राज्यात जन्मलेला प्रत्येक मल्ल महाराष्ट्र केसरी किताब मिळविण्याचे स्वप्न पाहात असतो. त्यामुळेच राज्य कुस्ती अधिवेशनास अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये राजकीय नेत्यांच्या ढवळाढवळीमुळे ही स्पर्धा म्हणजे राजकीय आखाडाच झाली आहे.
कुस्ती खेळास उद्योगसंस्था व शासनाचे फारसे सहकार्य नसताना या खेळास राजाश्रय मिळत असे. राजेरजवाडे संपले आणि संस्थानेही खालसा झाल्यानंतर या खेळांना वालीच उरला नव्हता. शासनाची मदत घेण्याखेरीज कुस्तीला अन्य कोणताच पर्याय नव्हता. शासनाची मदत हवी असेल तर राजकीय नेत्यांची मदत घेणेही अपरिहार्य होऊ लागले. कुस्तीची लोकप्रियता अजूनही आहे. महाराष्ट्र केसरी किताबाकरिता जवळजवळ एक लाख प्रेक्षक आवर्जून उपस्थित असतात. साहजिकच आपली राजकीय स्वप्ने साकार करण्यासाठी कुस्ती स्पर्धा हा योग्य मार्ग आहे असे राजकीय नेत्यांना वाटले तर नवल नाही. एखादा राजकीय नेता आपणहून जर महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करण्यासाठी तयारी दाखवत आहे असे पाहिल्यानंतर कुस्ती संघटकांची बरीचशी डोकेदुखी कमी होते. अकलूज, कडेगाव आणि अलीकडे भोसरी येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत राजकीय नेत्यांची विनाकारण ढवळाढवळ पाहावयास मिळाली.
केसरी किताबाच्या स्पर्धेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यांप्रमाणेच आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा, गुजरात, तामिळनाडू आदी राज्यांमधूनही हौसेने प्रेक्षक येत असतात. कुस्तीचे मैदान म्हणजे रटाळ भाषणबाजीसाठीचे व्यासपीठ नाही, एकमेकांवर शेरेबाजी करण्याची ही काही जागा नाही याचे भानच राजकीय नेत्यांना नसते. हातात माईक आला की आपण कुस्ती पाहायला आलो आहोत  याचा सारासार विचारही ते करीत नसतात. कुस्ती पाहावयास आलेल्या प्रेक्षकांना भाषणबाजी अजिबात आवडत नाही. त्यांना रंगतदार लढती पाहायच्या असतात.  यापूर्वी अनेक वेळा भाषणबाजीला कंटाळून प्रेक्षकांनी स्पर्धेत गोंधळ घातल्याचे अनेक प्रसंग घडले आहेत. प्रेक्षक गॅलरीची तोडफोड, खुच्र्याची फेकाफेके, व्यासपीठाच्या दिशेने मातीची ढेकळे फेकणे, दगडफेक, धक्काबुक्की असे अनेक प्रकारही घडले आहेत. भोसरी येथेही भाषणबाजी झाली. सुदैवाने प्रेक्षकांनी संयमाने सर्वकाही निमूटपणे सहन केले.
भोसरी येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत राजकीय गटबाजी प्रकर्षांने दिसून आली. ही स्पर्धा कुस्ती परिषदेचे सदस्य तसेच स्थानिक नगरसेवक महेश लांडगे यांनी आयोजित केली होती. त्यांना आमदारपदाचे स्वप्न दिसू लागले आहे. त्यामुळेच या स्पर्धेपूर्वी वरिष्ठ गटाची जिल्हा कबड्डी स्पर्धा अतिशय भव्य स्वरूपात आयोजित करून त्यांनी पारितोषिकांची उधळण केली. त्याच मैदानात लगेचच त्यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित केली. लांडगे हे त्या परिसरातील आमदारांचे राजकीय प्रतिस्पर्धी मानले जातात. त्यांच्याविरुद्ध शक्तिप्रदर्शन करण्यासाठी कुस्ती स्पर्धा ही हुकमी संधी ठरली. उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार तर समारोपासाठी राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांना पाचारण करीत त्यांनी आपण किती ताकदवान आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. अर्थात हे दोन्ही मंत्री राजकारणात अतिशय मुरलेले असल्यामुळे त्यांनीही आपल्या भाषणात लांडगे यांना कानपिचक्या देण्याची संधी सोडली नाही. राजकीय नेत्यांना उद्घाटन किंवा समारोपासाठी पाचारण करताना आपण खेळाडूंचा व प्रेक्षकांचा किती वेळ वाया घालवितो हे मात्र या संघटकांच्या लक्षात येत नाही. कुस्तीच्या लढतींमध्ये प्रमुख पाहुण्यांपेक्षाही सहभागी खेळाडूंना प्राधान्य दिले पाहिजे हे संयोजक लक्षातच घेत नाहीत. अंतिम दिवशी राजकीय नेत्यांच्या सत्कार समारंभांवर वेळ घालताना मैदानात मल्ल लढतीसाठी तयार आहे याचा संयोजकांना पूर्णपणे विसर पडला असावा. असे प्रसंग अनेक वेळा तेथे घडले. कुस्ती स्पर्धासाठी आजकाल समालोचन करणाऱ्यांना नेमले जाते.   हे समालोचकही हातात माईक असला की सतत बोलत राहतात. स्पर्धेच्या तांत्रिक अधिकाऱ्यांना खेळाडूंसाठी किंवा प्रेक्षकांसाठी काही महत्त्वाच्या सूचना करावयाच्या असतात याचे भानही त्यांना नसते. शेवटी या समालोचकांनी जरा शांत रहावे अशी सूचना तांत्रिक अधिकाऱ्यांकडून येते.कुस्तीला निधी कमी पडतो असे संघटक प्रत्येक स्पर्धेत बोलून दाखवितात. हे ऐकून राजकीय नेते किंवा मंत्री महोदय लगेचच काही घोषणा करतील अशी त्यांची अपेक्षा असते. वास्तविक केसरी स्पर्धेच्या वेळी पैशाची किती उधळपट्टी झाली हे चाणाक्ष प्रेक्षकांनाही लगेच लक्षात आले. अंतिम लढतीच्या वेळी संपूर्ण मैदानावर तसेच प्रेक्षकांवर हेलिकॉप्टरमधून अनेक वेळा पुष्पवृष्टी करण्यात आली. (कुस्तीसाठी आखाडय़ावरील फुलांचा सडा शेवटी दूर करावा लागला) संयोजकांनी किंवा त्याच्या प्रायोजकांनी हेलिकॉप्टरसाठी भरघोस खर्च केला, हा अनावश्यक खर्च टाळून त्यामध्ये भोसरी येथील तीन चार खेळाडूंच्या खुराकासाठी पैसा खर्च केला असता तर त्या खेळाडूंनी त्यांना दुवा दिला असता.
कुस्ती स्पर्धा आणि फेटे बांधणे याचे अतूट नाते आहे. या स्पर्धेच्या अंतिम दिवशी एक हजारहून अधिक नामवंत मल्ल व व्यक्तींना फेटे बांधण्यात आले. समजा एका फेटय़ाची किंमत शंभर रुपये गृहीत धरल्यास संयोजकांनी एक लाख रुपये केवळ फेटय़ांवर उधळले. याच पैशात तीन-चार होतकरू व गरजू मल्लांच्या एक वर्षांच्या आहाराकरिता आर्थिक तरतूद झाली असती. तसेच ज्या नामवंत पहिलवानांचा गौरव करण्यात आला त्यापैकी किती मल्लांनी खरोखरीच आतापर्यंत किती ऑलिम्पिक मल्ल घडविले आहेत याचा शोध कुस्ती संघटकांनी कधी घेतलाही नसेल. बहुतांश मल्ल हे केवळ सत्कार  स्वीकारण्यासाठीच व मिरविण्यासाठीच येतात असा अनुभव आहे. याबाबत महाबली सतपाल व कर्तारसिंग यांनी जाहीररीत्या महाराष्ट्राच्या कुस्तीगिरांवर टीका केली आहे. परंतु त्यापासून काहीही बोध महाराष्ट्राच्या ज्येष्ठ मल्लांनी घेतलेला नाही.
विविध प्रकल्पांकरिता मंत्र्यांकडे अगतिक होऊन आर्थिक निधीची मागणी केली जाते. मात्र कुस्तीचे किती प्रकल्प सुरू आहेत आणि अस्तित्वात असलेल्या कुस्ती स्टेडियमची दुरवस्था कोणाच्या चुकांमुळे झाली आहे याचा विचार प्राधान्याने करण्याची आवश्यकता आहे. राज्यांमधील अनेक तालमी बंद पडल्या आहेत. निधीच्या अयोग्य विनियोगामुळे राज्यातील अनेक कुस्ती संकुलांची दुरवस्था झाली आहे.पुण्यातील शिवाजी स्टेडियम व कात्रज येथील कुस्ती संकुल ही त्याची बोलकी उदारहणे आहेत. कात्रज येथील मोहोळ संकुलात मल्ल कशा स्थितीत राहतात, त्यांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते हा तर स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे. लोकांपुढे हात पसरण्यापूर्वी स्पर्धामध्ये होणारा अनाठायी खर्च कसा टाळता येईल याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. संयोजनात व्यावसायिकता आणि पारदर्शकता आणली तर कुस्ती संघटक हजारो रुपये वाचवू शकतील. वाचविलेल्या पैशांचा उपयोग प्रत्यक्ष खेळाडूंवर केला तर महाराष्ट्रातून ऑलिम्पिक पदकविजेते घडतील अशी आशा आहे.

Story img Loader