ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी आवश्यक असणाऱ्या परदेशी प्रशिक्षणाकरिता लागणारे आर्थिक पाठबळ मला प्रो कुस्ती लीगद्वारे मिळणार आहे. त्यामुळे ही लीग माझ्यासह सर्वच भारतीय मल्लांना लाभदायक ठरेल, असे महाराष्ट्राचा मल्ल राहुल आवारेने सांगितले.
भारतीय कुस्ती महासंघातर्फे डिसेंबरमध्ये होणाऱ्या कुस्ती लीगकरिता राहुलला मुंबई संघाने आपल्या ताफ्यात समावेश केले आहे. त्याच्याकरिता २३ लाख रुपये ही पायाभूत किंमत ठरवण्यात आली होती. त्याला संघात घेण्यासाठी हरयाणा व मुंबई फ्रँचाईजीमध्ये चढाओढ होती. मुंबईने त्याला २६ लाख ६० हजार मानधनाच्या बोलीवर संघात घेतले.
प्रो कुस्ती लीगबाबत राहुल म्हणाला की, ‘‘या स्पर्धेत अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू सहभागी होणार असल्यामुळे आम्हाला तेथील अनुभवाचा फायदा भावी कारकीर्दीसाठी होणार आहे. त्याचप्रमाणे या लीगमध्ये विविध संघांमध्ये लढत होणार असल्यामुळे सांघिक समन्वयालाही महत्त्व आहे. ही गोष्ट आमच्यासाठी फायदेशीर आहे. संघातील सहकारी खेळाडूंबरोबर एकत्रित सराव करण्याचाही आम्हाला लाभ होणार आहे. परदेशी खेळाडू कसे सराव करतात, त्यांचा आहार काय असतो, ते पूरक व्यायाम कसे करतात याबाबत त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मला मिळणार आहे. आगामी ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी ही मला शिकवणीची शिदोरीच असणार आहे.’’
राहुल हा ५७ किलो गटात लढत आहे. या गटात ऑलिम्पिक पात्रता पूर्ण करण्याचा त्याला आत्मविश्वास आहे. याबबात तो म्हणाला की, ‘‘पात्रता स्पर्धा जानेवारीत होईल. त्यापूर्वी काही दिवस परदेशात प्रशिक्षण घेण्याचा माझा मानस आहे. प्रो लीगच्या तारखा निश्चित झाल्यानंतर मी परदेशातील प्रशिक्षणाची कार्यक्रमपत्रिका ठरवणार आहे. या लीगद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नापैकी काही रक्कम या प्रशिक्षणावर खर्च केली जाईल व काही रक्कम माझ्याबरोबर कुस्ती केंद्रात सराव करणाऱ्या नवोदित खेळाडूंच्या विकासाकरिता खर्च करणार आहे.’’