ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या अनुपस्थितीत गॅरेथ बॅलेने गोलांचा धडाका लावला. रिअल माद्रिदसाठी गॅरेथ बॅले याने पहिली हॅट्ट्रिक नोंदवत व्हॅलाडॉलिड संघावर ४-० असा विजय मिळवून दिला. या कामगिरीमुळे विक्रमी बोली लावून विकत घेतलेल्या गॅरेथ बॅलेला प्रसारमाध्यमांनी ‘प्रिन्स ऑफ गोल्स’ अशी उपमा देत त्याची स्तुती केली आहे.
स्पॅनिश लीग फुटबॉल स्पर्धेतील व्हॅलाडॉलिडविरुद्धच्या सामन्यात रोनाल्डो मांडीचे स्नायू दुखावल्यामुळे खेळू शकला नाही. अँजेल डी मारियाच्या क्रॉसवर ३३व्या मिनिटाला बॅलेने रिअल माद्रिदचे खाते खोलले. तीन मिनिटांनंतर करीम बेन्झेमाने रिअल माद्रिदची आघाडी दुप्पट केली. बॅलेच्या क्रॉसवर बेन्झेमाने मारलेला अप्रतिम फटका थेट गोलजाळ्यात गेला.
दुसऱ्या सत्रात बॅलेने दोन गोलांची भर घालत हॅट्ट्रिक साजरी केली. प्रतिस्पध्र्याच्या कमकुवत बचावाचा फायदा घेत बॅलेने गोल साकारले. बॅलेच्या या दोन्ही गोलमध्ये मार्सेलो याने मोलाचा वाटा उचलला. ६४व्या मिनिटाला मार्सेलोच्या क्रॉसवर बॅलेने दुसरा गोल झळकावला. त्यानंतर पुन्हा एकदा मार्सेलोच्या मदतीने गोल साकारत बॅलेने स्पॅनिश लीग फुटबॉल स्पर्धेतील पहिली हॅट्ट्रिक नोंदवली. या विजयामुळे अव्वल स्थानावरील बार्सिलोना (४० गुण) आणि रिअल माद्रिद (३७ गुण) यांच्यात फक्त तीन गुणांचा फरक आहे. अॅटलेटिको माद्रिद ४० गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे.
‘‘रोनाल्डोच्या गैरहजेरीचे कोणतेही दडपण जाणवत नव्हते, पण दुसरा गोल झळकावल्यानंतर मी हॅट्ट्रिक साजरी करण्यासाठी उत्सुक होतो. मी या सामन्यात माझ्या खेळाचा मनमुराद आनंद घेतला,’’ असे बॅलेने सांगितले. त्याचे कौतुक करताना रिअल माद्रिदचे प्रशिक्षक कार्लो अँकलोट्टी म्हणाले, ‘‘बॅलेला अचूक सूर गवसला, हे त्याच्या या सामन्यातील कामगिरीवरून सांगता येईल. बॅले हा आमच्यासाठी महत्त्वपूर्ण खेळाडू आहे.’’
अर्सेनलचा ‘राम’से पावला
लंडन : आरोन रामसे याच्या सुरेख कामगिरीमुळे अर्सेनलने कार्डिफ सिटीवर ३-० असा दणदणीत विजय मिळवून इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉल स्पर्धेत सात गुणांच्या फरकाने अव्वल स्थानावर कब्जा केला. पहिल्या सत्रात २९व्या मिनिटाला हेडरद्वारे गोल केल्यानंतर दुसऱ्या सत्रात अतिरिक्त वेळेत गोल करत रामसेने या मोसमातील आपली गोलसंख्या १३वर नेली. मॅथ्यू फ्लॅमिनी याने ८६व्या मिनिटाला अर्सेनलसाठी दुसरा गोल केला. दुसऱ्या सामन्यांत, एव्हरटनने स्टोक सिटीचा ४-० असा धुव्वा उडवत गुणतालिकेत चौथे स्थान पटकावले. एव्हरटनकडून गेरार्ड डेलोफेऊ (४५व्या मिनिटाला), सीमस कोलमन (४९व्या मिनिटाला), ब्रायन ओव्हेडो (५८व्या मिनिटाला) आणि रोमेलू लुकाकू (७९व्या मिनिटाला) यांनी गोल केले. अन्य सामन्यांत, न्यूकॅसल संघाने वेस्ट ब्रूमविच अल्बियान संघावर २-१ असा विजय मिळवत पाचवे स्थान कायम राखले.