लिओनेल मेस्सीने नोंदवलेल्या दोन गोलच्या जोरावर बार्सिलोनाने लेव्हॅन्टे क्लबवर ४-१ अशी मात करीत ला लीग फुटबॉल स्पध्रेत अव्वल स्थानावर झेप घेतली.
युरोपियन चषक विजेत्या बार्सिलोनाने रिअल माद्रिद, व्हिलारील, सेल्टा व्हिगो यांच्यापेक्षा दोन गुणांची आघाडी घेतली आहे.
मेस्सीने अप्रतिम खेळाचा प्रत्यय घडविला. त्याने दोन गोल केले, पण अन्य गोलांमध्येही त्याने महत्त्वाचा वाटा उचलला. त्याने दिलेल्या पासवर मार्क बार्ताने संघाचे खाते उघडले, तसेच नेयमारनेही मेस्सीच्या पासवरच गोल केला. मेस्सीला आणखी एक गोल नोंदविता आला असता, मात्र त्याने पेनल्टी किकची संधी वाया घालविली. लुईस सुआरेझ व आंद्रेस इनिस्टा यांच्या अनुपस्थितीत मधल्या फळीत मेस्सीवर मोठी जबाबदारी होती. त्याचे दडपण न घेता त्याने सुरेख खेळ केला. लेव्हॅन्टे संघाचा एकमेव गोल व्हिक्टर कॅसेदिसुस याने केला.
युरोपियन लीग विजेत्या सेव्हिली क्लबची निराशाजनक मालिका कायम राहिली. सेल्टा व्हिगो क्लबने त्यांना २-१ असे पराभूत केले. सेल्टा व्हिगो संघाने चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. तिसरे स्थान घेणाऱ्या व्हिलारील संघाने अ‍ॅथलेटिक बिलबाओ संघावर ३-१ अशी मात केली. स्पोर्टिग गिजॉन संघाने उत्कंठापूर्ण लढतीत डिपोर्तिवो ला कोरुना संघाचा ३-२ असा पराभव केला.

Story img Loader