ला लिगा फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याच्या रिअल माद्रिदच्या आशा धूसर झाल्या आहेत. रिअल माद्रिदला महत्त्वपूर्ण सामन्यात व्हॅलेंसियाविरुद्ध २-२ अशी बरोबरी पत्करावी लागली. गुणतालिकेत आघाडीवर असलेल्या अ‍ॅटलेटिको माद्रिदला लेव्हान्टेकडून ०-२ असे पराभूत व्हावे लागल्यामुळे जेतेपदाची रंगत अखेरच्या सामन्यापर्यंत रंगणार, हे स्पष्ट झाले आहे.
दुखापतग्रस्त असतानाही ख्रिस्तियानो रोनाल्डोने अखेरच्या क्षणी बरोबरी साधणारा गोल करून रिअल माद्रिदला एक गुण मिळवून दिला. १८ वर्षांनंतर पहिल्यांदा ला लिगाचे जेतेपद पटकावण्यासाठी अ‍ॅटलेटिको माद्रिदला पुढील दोन सामन्यांत चार गुणांची आवश्यकता आहे. जवळपास महिन्याभरानंतर पहिल्यांदाच गॅरेथ बॅले आणि रोनाल्डो सुरुवातीलाच मैदानावर उतरले होते. तीन मिनिटांनंतर गॅरेथ बॅलेच्या सुरेख पासवर रोनाल्डोने मारलेला फटका व्हॅलेंसियाचा गोलरक्षक दिएगो अल्वेसच्या हातात गेला. करिम बेंझेमाने हेडरद्वारे मारलेला फटकाही गोलजाळ्याच्या बाजूने गेला. त्यानंतर १६व्या मिनिटाला व्हॅलेंसियाच्या दानी परेजोने गोलसाठी केलेला प्रयत्न रिअल माद्रिदचा गोलरक्षक दिएगो लोपेझने परतवून लावला.
जेरेमी मॅथ्यूने पहिल्या सत्राच्या आधी गोल करत व्हॅलेंसियाला आघाडीवर आणले. दुसऱ्या सत्रात ५९व्या मिनिटाला सर्जीओ रामोसने गोल करत रिअल माद्रिदला बरोबरी साधून दिली. सहा मिनिटानंतर डॅनियल परेजोने दुसऱ्या गोलाची भर घालत व्हॅलेंसियाला २-१ असे आघाडीवर आणले. मात्र ९०+२व्या मिनिटाला रोनाल्डोने गोल केल्यामुळे रिअल माद्रिदला सामना बरोबरीत सोडवता आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुन्हा वर्णद्वेषी शेरेबाजी
बार्सिलोनाचा बचावपटू दानी अल्वेस यांच्यावर चाहत्यांनी केळे फेकल्याचा प्रकार ताजा असतानात अ‍ॅटलेटिको माद्रिद आणि लेव्हान्टे यांच्यात रविवारी रात्री झालेल्या सामन्यात पुन्हा वर्णद्वेषी प्रकार घडला आहे. लेव्हान्टेचा सेनेगलचा मधल्या फळीतील फुटबॉलपटू पपे डिऑप याला चाहत्यांनी माकडाचे हावभाव करून त्याला हिणवले. अ‍ॅटलेटिको माद्रिदला या सामन्यात पराभूत व्हावे लागल्यामुळे त्यांच्या चाहत्यांनी असा लांच्छनास्पद प्रकार केला, असा आरोप डिऑपने केला आहे. तो म्हणाला, ‘‘कॉर्नर घेत असताना चाहत्यांनी मला माकड म्हणून संबोधले. त्यानंतर मी नृत्य करून त्याला चोख उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मी कोणत्याही प्रकारे चाहत्यांचा अवमान केला नाही. असे प्रकार थांबायला हवेत.’’

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: La liga match real madrid 2 2 valencia