नवी दिल्ली : संवाद हा कोणत्याही सांघिक खेळाच्या यशाचा मुख्य गाभा असतो. मात्र सौरभ चौधरीशी असलेला संवादाचा अभाव, हेच आमच्या यशाचे रहस्य असल्याचे युवा नेमबाज मनू भाकर हिने सांगितले. सौरभ-मनू जोडीने या वर्षांत झालेल्या चारही विश्वचषक नेमबाजी स्पर्धाच्या मिश्र दुहेरीत सुवर्णपदक पटकावण्याची किमया साधली.
रिओ दी जानिरो येथील विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत एकूण ९ पदकांची कमाई करणाऱ्या भारतीय नेमबाजांचा शुक्रवारी केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ‘‘आमच्या दोघांमध्ये फारसा संवाद होत नाही. आम्ही दोघेही विभिन्न धाटणीचे आहोत. परंतु न बोलताही वैयक्तिक कामगिरीवर भर देतो. माझ्या कामगिरीबाबत तो जराही भाष्य करत नाही. त्यामुळेच मनमोकळेपणाने नेमबाजी करत आम्ही चांगली कामगिरी करत आहोत,’’ असे मनूने सांगितले.
टोक्यो ऑलिम्पिकच्या तयारीविषयी मनू म्हणाली, ‘‘ऑलिम्पिक हे कोणत्याही खेळाडूचे स्वप्न असते. ही ऑलिम्पिक माझ्या आयुष्यातील संस्मरणीय ठरावी, अशी आशा आहे. माझ्या नशिबात काय आहे, ते मला माहीत नाही. मात्र सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न मी करणार आहे.’’