प्रो कबड्डी लीगच्या चौथ्या हंगामातील बंगळुरू टप्प्यात पंचांमध्ये वारंवार समन्वयाचा अभाव जाणवल्याचे कबड्डी चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. पंच परस्परविरोधी निर्णय देत असल्याने खेळाडूंनीही संताप व्यक्त केल्याचे गुरुवारच्या लढतीत पाहायला मिळाले. त्यामुळेच जयपूर पिंक पँथर्सचा कर्णधार जसवीर सिंग व यू मुंबाचा राकेश कुमार यांच्यात शाब्दिक द्वंद्व रंगल्याचा निष्कर्ष काढला जात आहे.
‘‘पंच परस्परविरोधी निर्णय देत असल्याची बाब या टप्प्यात आढळली, परंतु हे फार कमी वेळा घडले. पण एकंदर विचार केल्यास पंच चोख कामगिरी बचावत आहेत. कबड्डीत अनुभवातून नवीन बाबी समोर येत आहेत व त्यावर नक्की तोडगा काढण्यात येईल,’’ असे पंचप्रमुख विश्वास मोरे यांनी सांगितले.
जयपूर-मुंबई सामन्यात पंचांनी अनेक निर्णय चुकीचे व संभ्रम निर्माण करणारे होते. मुंबाच्या अनुप कुमारने केलेल्या चढाईत जयपूरचा खेळाडू बाद होता. खेळाडू स्वत:हून बाद असल्याचे कबूल करत असतानाही पंचांनी त्याला नाबाद ठरवले व मग दोन्ही संघांमध्ये वाद झाला. खेळाडूंच्या विरोधानंतर पंचांनी निर्णय बदलला. बंगाल- बंगळुरू सामन्यातही चुकीच्या निर्णयाने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हैदराबादच्या टप्प्यात तेलुगू टायटन्सने पंचांच्या हेतूविषयी शंका घेतली होती. त्याची तक्रार अजून स्वीकारण्यात आलेली नाही. अशात पंचाकडून होत असलेल्या या चुकांची दखल कधी घेण्यात येईल, असा प्रश्न विचारला जात आहे.
पंचांच्या काही चुकीच्या निर्णयामुळे राकेश नाराज झाला होता आणि त्याचे रूपांतर संतापात झाले.
– अनुप कुमार, यू मुंबाचा कर्णधार