भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) महिला क्रिकेटपटूंना सापत्न वागणूक मिळत असून त्यामुळेच आपल्या देशात महिला क्रिकेटची अधोगती झाली आहे, असे भारताची माजी कर्णधार डायना एडुलजी हिने सांगितले.
संतप्त डायना म्हणाली की, ‘‘याच प्रकारे सापत्न वागणूक मिळत राहिली तर एक दिवस महिला क्रिकेटचे नामोनिशाण आपल्या देशात राहणार नाही. बीसीसीआयकडे आमचा खेळ गेल्यावर खेळाला सुगीचे दिवस येतील असे आम्हाला वाटले होते. मात्र प्रत्यक्षात विरोधी चित्र पाहायला मिळत आहे. अगोदरची स्थिती चांगली होती असेच आता वाटत आहे. केवळ औपचारिकता म्हणून ते महिलांचे क्रिकेट सांभाळत आहेत. पुरुष व महिला क्रिकेटचे व्यवस्थापन आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) करीत असल्यामुळेच भारतात थोडय़ाफार प्रमाणात महिला क्रिकेटचे अस्तित्व राहिले आहे. महिला क्रिकेटपटूंना आपल्या देशात अवमानकारक वागणूक मिळत आहे.’’
‘‘एकाच खेळात पुरुष व महिला खेळाडूंना असमान वागणूक मिळत आहे. सुरुवातीला भारतीय महिला खेळाडूंना अतिशय साध्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते, मात्र काही खेळाडूंनी याबाबत तक्रार केल्यानंतर खेळाडूंना आलिशान हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. महिला खेळाडूंना प्रत्येक व्यवस्थेसाठी झगडावे लागते तर पुरुषांना न मागताच सर्व काही मिळते,’’ असेही डायना हिने सांगितले. ती पुढे म्हणाली, ‘‘मी माझ्या मोटारीतून मरिन ड्राइव्हने जात असताना लाल टी शर्ट्स परिधान केलेल्या भारतीय खेळाडू रस्त्याने सी हॉटेलकडून वानखेडे स्टेडियमवर चालत चालल्या होत्या. त्यांना पाहून मी मोटार थांबविली व त्यांना भेटले. तेव्हा त्यांच्याशी चर्चा करण्याची संधी मला मिळाली. भारतीय संघास चालत स्टेडियमकडे जावे लागते, यासारखी अन्य दुर्दैवाची गोष्ट नाही.’’
‘‘या खेळाडूंना सरावासाठी पोलीस जिमखाना, हिंदू जिमखाना, मुंबई जिमखाना यासारखी मैदाने देण्यात आली आहेत. भारतीय पुरुष संघास अशी वागणूक दिली तर चालेल काय,’’ असा सवाल यावेळी डायना यांनी उपस्थित केला. त्या पुढे म्हणाल्या, ‘‘भारतीय पुरुष संघाच्या तुलनेत महिला खेळाडूंना खूपच कमी मानधन दिले जाते, तसेच अनेक सुविधांपासून त्यांना वंचित रहावे लागले आहे. त्यांना परदेशी संघाबरोबर फारशी स्पर्धात्मक सरावाची संधी मिळत नाही. त्यांना प्रोत्साहनही दिले जात नाही. महिला क्रिकेटमध्ये निवड समिती सदस्यांना सर्वात जास्त मानधन मिळते. त्याखालोखाल सामनाधिकारी व पंच यांना मानधन मिळते. महिला खेळाडूंना त्यांच्यापेक्षाही कमी मानधन मिळत आहे. असे असूनही भारताची कर्णधार मिताली राज हिच्यासह भारताच्या अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अव्वल दर्जाची कामगिरी केली आहे. दुर्दैवाने त्यांच्या कामगिरीची दखल आपल्याकडे गांभीर्याने घेतली जात नाही.’’
बीसीसीआयचे महाव्यवस्थापक (क्रिकेट विकास) रत्नाकर शेट्टी यांनी सांगितले की, ‘‘२००६मध्ये महिला क्रिकेटची जबाबदारी आमच्याकडे आल्यानंतर महिला क्रिकेटपटूंना बीसीसीआयकडून भरपूर मदत केली जात आहे. त्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यात आल्या आहेत. प्रत्येक राज्य संघटनेने महिलांकरिता प्रशिक्षण अकादमी सुरू केली आहे. त्यामध्ये प्रशिक्षक, फिजिओ, ट्रेनर आदी सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत. सर्व महिला खेळाडूंनीही त्याबाबत समाधान व्यक्त केले आहे.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा