भारताचा फिरकीपटू अमित मिश्राविरुद्ध एका महिलेने बंगळुरूत दाखल केलेली कथित मारहाणीची तक्रार मागे घेण्यात आली आहे. तक्रार दाखल केल्यानंतर दोन दिवसांनी मी पोलीस स्थानकाशी संपर्क साधला. त्यानंतर मिश्राविरुद्धची तक्रार मागे घेण्याचा निर्णय घेतला, असे तक्रारदार महिलेने सांगितले. ‘‘अमितने पोलीस स्थानकात दाखल होण्याची मी प्रतीक्षा केली. सामंजस्याने तक्रार मागे घेण्याचा निर्णय घेतला. आम्ही मित्र होतो, आमच्यात भांडण झाले. पण आम्ही चांगले मित्र राहू,’’ असे या महिलेने सांगितले. गेल्या महिन्यात भारतीय संघाचे सराव शिबीर बंगळुरूत चालू असताना हा प्रकार घडला. एका आठवडय़ाच्या आत हजर राहण्याचे आदेश पोलिसांनी मिश्राला दिले होते. भारतीय दंड संहितेच्या ३५४ कलमानुसार मिश्रावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोणताही दबाव किंवा दडपणाखाली तक्रार मागे घेतलेली नाही, असे तक्रारदार महिलेने स्पष्ट केले.

Story img Loader