गोलरक्षक सविताकुमारीने केलेल्या नेत्रदीपक गोलरक्षणामुळेच भारताला जागतिक हॉकी लीगमधील महिलांच्या गटात जपानवर १-० असा विजय मिळविता आला. या विजयामुळे भारताच्या ऑलिम्पिक प्रवेशाच्या आशा कायम राहिल्या.
पाचव्या स्थानासाठी सुरू असलेल्या ‘प्ले-ऑफ’च्या लढतीत भारताने जपानवर मात केली, त्या वेळी एकमेव गोल राणी रामपालने १३ व्या मिनिटाला नोंदविला. वंदना कटारियाने मारलेला फटका जपानच्या गोलरक्षकाने परतविला, पण राणीने शिताफीने चाल करीत चेंडू गोलमध्ये तटविला. अर्थात सामन्यातील विजयाचे श्रेय सविताला द्यावे लागेल. तिने किमान सहा-सात गोल वाचविले. अन्यथा ही लढत जपानने एकतर्फी जिंकली असती. जपानला शेवटच्या पंधरा मिनिटांत पाच वेळा पेनल्टी कॉर्नर मिळाले, मात्र प्रत्येक वेळी सविताने या चाली अयशस्वी ठरवल्या.
या विजयामुळे भारताला पाचवे स्थान मिळाले आहे. त्यामुळे भारताच्या ऑलिम्पिक प्रवेशाच्या संधी वाढल्या आहेत. येथील स्पर्धा तसेच व्हॅलेंसिया येथील उपांत्य फेरीद्वारे प्रत्येकी तीन संघ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणार आहेत. त्याखेरीज पाचही खंडांमधील विजेता संघ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरतो. २०१६ ची ऑलिम्पिक स्पर्धा ब्राझीलमध्ये होत असल्यामुळे त्यांना यजमान देश म्हणून यापूर्वीच प्रवेश मिळाला आहे. जागतिक हॉकी लीग व विविध खंडांमधील विजेते यामधून एकच संघ दोन ठिकाणी असेल, तर नंतरच्या संघांना प्रवेश दिला जातो. त्यावरच भारताचा ऑलिम्पिक प्रवेश अवलंबून राहणार आहे. त्याकरिता आणखी दोन आठवडे वाट पाहावी लागणार आहे.
पुरुष संघापुढे आज कांस्यपदकासाठी इंग्लिश कसोटी
बेल्जियमविरुद्ध लाजिरवाणा पराभव स्वीकारणाऱ्या भारतीय पुरुष संघाला जागतिक हॉकी लीगमध्ये कांस्यपदकासाठी आज इंग्लंडच्या कसोटीस उतरावे लागणार आहे.
भारतास बेल्जियमने उपांत्य फेरीत ४-० अशी धूळ चारली होती. पदक मिळविण्यासाठी भारताला अतिशय कठीण परीक्षेला उतरावे लागणार आहे. जागतिक क्रमवारीत इंग्लंडपेक्षा भारतीय संघ चार क्रमांकांनी खाली आहे. इंग्लंडला उपांत्य फेरीत विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाने ३-१ असे हरविले होते. या सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला जिद्दीने लढत दिली होती. साखळी गटात ऑस्ट्रेलियाविरुद्ध दारुण पराभव स्वीकारल्यानंतर भारताने उर्वरित सामन्यांमध्ये सातत्यपूर्ण खेळ करीत उपांत्य फेरी गाठली होती, मात्र तेथे त्यांनी यजमान बेल्जियमविरुद्ध सपशेल निराशाजनक खेळ करीत सामना गमावला. हे लक्षात घेता त्यांना कांस्यपदकासाठी पूर्ण ताकदीनिशी उतरावे लागणार आहे.
हेग येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेत शेवटच्या मिनिटाला झालेल्या गोलच्या आधारे इंग्लंडने भारतावर २-१ अशी मात केली होती. गतवर्षी चॅम्पियन्स चषक स्पर्धेतील सहभागापासून वंचित राहिलेल्या इंग्लंडपुढे रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविण्याचे ध्येय आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा