टी २० वर्ल्डकपमध्ये बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या सामन्यात खेळाडू मैदानातच भिडले होते. श्रीलंकेचा गोलंदाज लाहिरू कुमारा आणि लिटन दास यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. आता या दोन्ही खेळाडूंना आयसीसीने दोन्ही खेळाडूंना दंड ठोठावला आहे. दोन्ही खेळाडूंना दोषी धरण्यात आलं. कुमाराच्या सामना शुल्काच्या २५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. तर लिटन दासच्या सामना शुल्कातून १५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. कुमाराला आचारसंहितेच्या कलम २.५ चं उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी धरण्यात आलं आहे.
कुमाराने सहाव्या षटकाचा पाचवा चेंडू टाकत लिटन दासला बाद केलं. तसेच त्याला काहीतरी बोलल्याने दासने त्याला प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर दोन्ही खेळाडू आमनेसामने आले. यावेळी नईम मध्यस्थीसाठी पुढे आला आणि कुमाराचा हात पकडला. या दरम्यान मैदानातील वातावरण चांगलंच तापलं होतं. त्यानंतर श्रीलंकेच्या अन्य खेळाडूंनी पुढे येत प्रकरण मिटवलं. त्यानंतर सामन्याला पुन्हा सुरुवात झाली होती.
टी २० वर्ल्डकपच्या सुपर १२ फेरीत श्रीलंकेनं बांगलादेशला ५ गडी राखून पराभूत केलं. बांगलादेशने श्रीलंकेला ४ गडी गमवून १७२ धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान श्रीलंकेनं १८ षटकं ५ चेंडूत ५ गडी गमवून पूर्ण केलं.
श्रीलंका : दसुन शनका (कर्णधार), कुशल परेरा, पथुम निस्सांका, चरिथ असलंका, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षे, चमिका करुणारत्ने, वानिंदू हसरंगा, दुश्मंथा चमीरा, लाहिरू कुमारा, बिनुरा फर्नांडो
बांगलादेश : मोहम्मद नईम, लिटन दास, शाकिब अल हसन, मुशफिकूर रहिम, मोहम्मद महमदुल्ला (कर्णधार), अफिफ होसेन, नुरुल हसन, मेहेदी हसन, नसुम अहमद,मोहम्मद सैफुद्दीन, मुस्तफिजूर रहमान