लाहोर : लाहोर येथील गद्दाफी स्टेडियम आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने आयोजित करण्यासाठी सज्ज झाले असून येथील नूतनीकरणाचे काम विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आल्याचा दावा पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडून (पीसीबी) करण्यात आला आहे.
आगामी चॅम्पियन्स करंडकापूर्वी पाकिस्तानातील तीन स्टेडियमचे नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. हे काम संथ गतीने सुरू असल्याची माहिती देण्यात येत होती. मात्र, लाहोर येथील स्टेडियमचे नूतनीकरणाचे काम अवघ्या ११७ धावांत पूर्ण करण्यात आले. हा एक प्रकारे विक्रमच असून हे स्टेडियम चॅम्पियन्स करंडकासह आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या आयोजनासाठी सज्ज असल्याचे ‘पीसीबी’कडून गुरुवारी सांगण्यात आले. या स्टेडियममध्ये नव्याने प्रकाशझोत (फ्लडलाइट्स) लावण्यात आला असून आसनक्षमताही वाढविण्यात आली. तसेच स्टेडियममध्ये इलेट्रॉनिक धावफलकही बसविण्यात आल्याचे ‘पीसीबी’ने सांगितले.
‘‘अनेकांनी दिवस-रात्र मेहनत करून हे स्टेडियम तयार केले आहे. या सर्वांचा मी आभारी आहे. आमच्यावर बरीच टीका झाली. मात्र, आम्ही काम वेळेत पूर्ण केले आहे,’’ असे ‘पीसीबी’चे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी सांगितले. पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांच्या हस्ते शुक्रवारी या स्टेडियमचे उद्घाटन केले जाणार आहे. या स्टेडियमवरील पहिला एकदिवसीय सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात ८ फेब्रुवारीला होणार आहे.