टाटा खुली बॅडमिंटन स्पर्धा
टाटा खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम सामन्यांमध्ये भारताचा लक्ष्य सेन आणि अश्मिता चलिहाने बाजी मारत विजेतेपदाला गवसणी घातली. या विजयासह लक्ष्यने गत महिन्यातील कनिष्ठ जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत थायलंडच्या कुनलावत वितिदसरनकडून झालेल्या पराभवाचा वचपा काढला.
कॅनडामध्ये गेल्या महिन्यात झालेल्या कनिष्ठ जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत कुनलावतने लक्ष्यला तीन गेममध्ये पराभूत केले होते. त्या पराभवाचा वचपा काढण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरलेल्या लक्ष्यने या अंतिम सामन्यात सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत कुनलावतला अजिबात संधी दिली नाही. अवघ्या ३५ मिनिटात संपुष्टात आलेल्या या सामन्यात लक्ष्यने २१-१५, २१-१० अशी मात केली. तर महिला एकेरीमध्ये अश्मिताने वृषाली गुम्माडीवर २१-१६, २१-१३ असा विजय मिळवत विजेतेपदाचा मुकुट पटकावला. अवघ्या ३० मिनिटांत बाजी मारत अश्मिताने पहिल्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. तर पुरुष दुहेरीत सुमीत रेड्डी आणि अर्जुन एम. आर. यांनी मलेशियन जोडीवर मात करीत विजेतेपद पटकावले.