Lakshya Sen Age Fraud Case Updates: भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन मोठ्या वादात अडकला आहे. ऑलिम्पियन लक्ष्य सेन, त्याचा भाऊ चिराग सेन, वडील धीरेंद्र सेन, आई निर्मला सेन आणि प्रशिक्षक यू विमल कुमार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यांनी लक्ष्य आणि चिराग या दोन्ही भावांच्या जन्माची खोटी कागदपत्रे दिल्याचा आरोप केला आहे. ज्युनियर स्पर्धेत भाग घेता यावा म्हणून त्याचे वय अडीच वर्षांनी कमी करण्यात आल्याचा आरोप दाखल करण्यात आला आहे. पण आता लक्ष्य सेनला सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुधांशू धुलिया आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनच्या खटल्यात कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली आहे, ज्यामध्ये त्याच्या जन्मतारीख (वय) संबंधित फसवणुकीच्या आरोपांची चौकशी करण्याची परवानगी देण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक उच्च न्यायालयालाही नोटीस बजावली आहे. अर्जुन पुरस्कार विजेतe बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन आणि त्याचा भाऊ चिराग सेन यांनी जन्मतारखेच्या वादात कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
बॅडमिंटन अकादमी चालवणारे नागराज एमजी यांनी आरोप केला आहे की प्रकाश पदुकोण बॅडमिंटन अकादमीचे बॅडमिंटन प्रशिक्षक विमल कुमार यांनी २०१० मध्ये लक्ष्य सेन आणि चिराग सेन यांच्या पालकांच्या संगनमताने जन्म प्रमाणपत्राची खोटी कागदपत्रे सादर केली होती. जेणेकरून त्यांना विशिष्ट वयोगटातील स्पर्धांमध्ये भाग घेण्याची परवानगी मिळू शकेल. या स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर शासकीय लाभ मिळवण्यासाठी जन्म दाखला खोटा दाखवण्यात आल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. त्यांनी आपल्या युक्तिवादाच्या समर्थनार्थ आरटीआयद्वारे प्राप्त केलेली काही कागदपत्रे सादर केली.
पोलिसांनी भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम ४२० (फसवणूक), ४६८ (फसवणूक करण्याच्या उद्देशाने खोटी) आणि ४७१ (खोटी रेकॉर्ड अस्सल म्हणून वापरणे) अंतर्गत गुन्हा नोंदवला. मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटच्या सूचनेनुसार २ डिसेंबर २०२२ रोजी एफआयआर नोंदवण्यात आला होता, परंतु त्यावेळेस कर्नाटक उच्च न्यायालयाने २२ डिसेंबर २०२२ रोजी अंतरिम आदेश देऊन तपास स्थगित केला होता.
कर्नाटक हायकोर्टाने बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन, त्याचे कुटुंब आणि त्याचे प्रशिक्षक यू विमल कुमार यांच्या जन्म प्रमाणपत्रात खोटेपणाचा आरोप करणाऱ्या याचिका फेटाळून लावल्या आणि उच्च न्यायालयाने सांगितले की, या प्रकरणात प्रथमदर्शनी पुरावे आहेत जे तपासाची गरज दर्शवतात.
द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, न्यायमूर्ती एमजी उमा यांनी १९ फेब्रुवारीला हा आदेश दिला होता आणि तो नुकताच उपलब्ध झाला. याचिका फेटाळताना न्यायमूर्ती एमजी उमा म्हणाले, ‘जेव्हा प्रथमदर्शनी सामग्री रेकॉर्डवर ठेवली जाते ज्यामध्ये गुन्हा असल्याचा दावा केला जातो, तेव्हा मला तपास थांबवण्याचे किंवा फौजदारी कारवाई रद्द करण्याचे कोणतेही कारण दिसत नाही. तक्रारदाराने योग्य प्राधिकाऱ्यांकडून आरटीआय कायद्यांतर्गत प्राप्त केलेली कागदपत्रे असलेली महत्त्वपूर्ण सामग्री न्यायालयासमोर ठेवली. अशा स्थितीत मला याचिकांवर विचार करण्याचे कोणतेही कारण दिसत नाही.
लक्ष्य सेन आणि चिराग सेन यांच्यासह पालक आणि प्रशिक्षक यांनी डिसेंबर २०२२ मध्ये त्यांच्याविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याची मागणी केली. द हिंदूच्या वृत्तानुसार, याचिकाकर्त्यांनी दावा केला आहे की त्यांचा अपमान करण्यासाठी बिनबुडाचे आरोप करण्यात आले आहेत. खरं तर, २०२० मध्ये, नागराज यांच्या मुलीला प्रकाश पदुकोण बॅडमिंटन अकादमीमध्ये प्रवेश देण्यात आला नाही कारण त्यांच्या मुलीने अकादमीमध्ये प्रवेश घेण्यासाठी निकष पूर्ण केले नव्हते.