Lakshya Sen on Prakash Padukon While Interacting with PM Narendra Modi: भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या पॅरिस ऑलिम्पिकमधील खेळाडूंची भेट घेतली. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये त्यांच्या चांगल्या कामगिरीनंतर परतलेल्या भारतीय खेळाडूंसोबत पंतप्रधान मोदींनी खास चर्चाही केली. या चर्चेदरम्यान त्यांनी देशातील युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याच्याशी बोलताना पॅरिस ऑलिम्पिकमध्ये काय शिकायला मिळालं, याबाबत चर्चा केली. पण यादरम्यानच लक्ष्यने त्याचे प्रशिक्षक प्रकाश पदुकोण यांच्याबद्दलही सांगितले. संभाषणादरम्यान पीएम म्हणाले, “जेव्हा मी लक्ष्यला पहिल्यांदा भेटलो तेव्हा तो खूपच लहान होता. पण आज ते खूप मोठा झाला आहे.
पंतप्रधान मोदींच्या या वाक्यानंतर सर्वच जण हसू लागले. यावेळी, बॅडमिंटन स्टारने पॅरिस ऑलिम्पिकमधील अनुभव सर्वांसह शेअर केला. लक्ष्य सेन म्हणाला, माझी ही टूर्नामेंट खूप मोठी होती. तिथले सामने बराच काळ चालले. पण सामन्यादरम्यान लक्ष नेहमीच माझ्या सामन्यांवर राहिले. आम्हाला जेव्हाही मोकळा वेळ मिळायचा तेव्हा आम्ही एकत्र जेवायला जायचो. असे अनेक खेळाडू मला तिथे भेटले. ज्यांच्याकडून मला तिथे खूप काही शिकायला मिळालं. आम्ही त्यांच्यासोबत डाईनिंग रूममध्ये एकत्र बसायचो. माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती.
लक्ष्य सेन भारताकडून पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी आला होता. यावेळेस तो म्हणाला, माझा हा पहिलाच ऑलिम्पिक अनुभव होता आणि तो खूप चांगला होता. एवढ्या मोठ्या स्टेडियममध्ये इतक्या लोकांसमोर खेळत होतो. सुरूवातीला पहिल्या एक-दोन सामन्यांत मला अस्वस्थ वाटत होते. मात्र, जसजशी स्पर्धा पुढे सरकत गेली. माझा आत्मविश्वासही वाढला.
प्रकाश पदुकोण यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या बॅडमिंटन संघाचे मुख्य प्रशिक्षकपद भूषवले होते, आणि तेव्हापासून त्यांनी खेळाडूंसोबतच्या कठोर आणि शिस्तबद्धतेमुळे नावलौकिक मिळवला आहे. व्हिडिओमध्ये, पीएम मोदींनी लक्ष्यला विचारले की त्याला त्याच्या आजूबाजूच्या चाहत्यांकडून होणारी वाहवा त्याचे व्हायर झालेले रिल्स याची जाणीव आहे का, यावर लक्ष्यने प्रकाश पदुकोण यांंच्या कठोर नियमांच्या उदाहरणासह उत्तर दिले.
संवादादरम्यान पीएम मोदी म्हणाले, “तूला माहीत आहे. तू तर सेलिब्रिटी झाला आहेस. यावर उत्तर देताना लक्ष्य म्हणाला, “सामन्यांदरम्यान प्रकाश सरांनी माझा फोन काढून घेतला होता आणि सांगितले होते की जोपर्यंत सामने संपत नाही तोपर्यंत फोन मिळणार नाही. पण हो, मला खूप पाठिंबा मिळाला. हा (पॅरिस ऑलिम्पिक) एक शिकण्याचा चांगला अनुभव होता. माझ्यासाठी ही स्पर्धा थोडी निराशाजनकही होती कारण की मी इतक्या जवळ आल्यानंतरही पदक जिंकू शकलो नाही. मी पुढच्या वेळेस माझ्याकडून सर्वोत्तम प्रयत्न करेन, ” असे लक्ष्यने पीएम मोदींना सांगितले.