भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीवर दिवसेंदिवस निवृत्तीसाठी दबाव वाढत असताना, भारतीय संघाचे माजी व्यवस्थापक लालचंद राजपूत यांनी धोनीला आपला पाठिंबा दर्शवला आहे. धोनी अजूनही वन-डे सामन्यांसोबत टी-२० सामन्यांमध्ये खेळू शकतो, असं स्पष्ट मत राजपूत यांनी व्यक्त केलं आहे. २००७ साली टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे लालचंद राजपूत व्यवस्थापक म्हणून काम पाहत होते. याच स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध अंतिम सामन्यात अखेरचं षटक जोगिंदर शर्माला देण्याचा धोनीचा निर्णय हा विचार करुन घेतला होता असंही राजपूत म्हणाले.
अवश्य वाचा – Photos : धोनी लेफ्टनंट कर्नलच्या भूमिकेत काश्मीर दौऱ्यावर
“सध्या धोनीने राजीनामा द्यावं असं अनेकांचं मत झालेलं आहे, मात्र मला यात जराही तथ्य वाटत नाही. धोनी अजुनही वन-डे आणि टी-२० सामन्यांमध्ये खेळू शकतो. कोणत्याही इतर खेळाडूंप्रमाणे धोनी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आहे. याचसोबत धावा घेताना त्याच्यातली गती अजूनही कायम टिकून आहे. त्यामुळे धोनीची जागा दुसरा कोणता खेळाडू घेईल असं सध्यातरी दिसत नाही. आजही धोनी भारतीय संघातला सर्वोत्तम फिनिशर आहे.” ‘टाईम्स ऑफ इंडिया’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राजपूत बोलत होते.
२००७ च्या विश्वचषकादरम्यानचा किस्सा सांगताना राजपूत म्हणाले, ” अनेकांना अंतिम सामन्यात शेवटचं षटक जोगिंदर शर्माला देणं हा एकाप्रकारचा जुगार वाटला होता. मात्र, धोनीने काही गोष्टींचा विचार करुन जोगिंदरला शेवटचं षटक टाकायला दिलं होतं. अंतिम सामन्याआधी झालेल्या टीम मिटींगमध्ये धोनी एकदा मला म्हणाला होता, अटीतटीच्या प्रसंगात जोगिंदर शर्मा आपल्याला फायदेशीर ठरु शकतो. अखेरच्या षटकात यॉर्कर चेंडु टाकण्यासोबत स्टंप-टू-स्टंप मारा करण्याची जोगिंदरच्या गोलंदाजीत ताकद आहे. त्यामुळे समोरच्या फलंदाजाला त्याच्या गोलंदाजीचा अंदाज लावणं कठीण होतं.”
लालचंद राजपूत सध्या रणजी करंडक स्पर्धेत आसामच्या संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २००७ साली टी-२० विश्वचषक जिंकला होता. यावेळी भारतीय संघाचे व्यवस्थापक म्हणून लालचंद राजपूत यांनी काम पाहिलं होतं. त्यामुळे एकीकडे धोनीच्या निवृत्तीविषयीची चर्चा तीव्र होत असताना राजपूत यांनी धोनीची केलेली पाठराखण ही अत्यंत महत्वाची मानली जात आहे.
अवश्य वाचा – धोनीला पर्यायासाठी शोध सुरू?, श्रीलंकेविरुद्ध वन-डे मालिकेसाठी संजू सॅमसनला संधी मिळण्याचे संकेत