राजस्थान क्रिकेट संघटनेच्या १९ डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकीत आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी रिंगणात उतरणार असल्याचे मोदी यांचे वकील मेहमूद अब्दी यांनी स्पष्ट केले.
आरसीएच्या अध्यक्षपदासाठी केंद्रीय मंत्री व विद्यमान अध्यक्ष सी. पी. जोशी हे रिंगणात आहेत. त्यांच्याविरुद्ध मोदी उभे राहणार आहेत. राज्य संघटनेशी संलग्न असलेल्या १९ सदस्यांनी मोदी यांना पाठिंबा दिला असून जयपूरमध्ये नुकतीच त्यांची बैठकही झाल्याचे समजते.
भारतामधील क्रिकेटच्या कोणत्याही संघटनेत सहभागी होण्यास बीसीसीआयने बंदी घातली असली तरी त्याकडे कानाडोळा करत मोदी यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरून बीसीसीआयला जणूकाही आव्हानच दिले आहे. आपल्यावर घातलेल्या बंदीच्या निर्णयाविरुद्ध मोदी हे न्यायालयात आव्हान देणार आहेत, निवडणूक लढविण्यात मोदी यांना कोणताही कायदेशीर अडथळा नाही. ते एका जिल्हा संघटनेचे अध्यक्ष असल्यामुळे राज्याच्या संघटनेची निवडणूक लढविण्याचा त्यांना हक्क आहे, निवडणूक कार्यक्रमपत्रिकेनुसार ते आपला अर्ज लवकरच सादर करणार आहेत, असे मेहमूद यांनी सांगितले.

Story img Loader