आयपीएलमधील गैरव्यवहारप्रकरणी आजीवन बंदी घालण्यात आलेले आयपीएलचे माजी वादग्रस्त अध्यक्ष ललित मोदी राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या (आरसीए) अध्यक्षपदी निवडून आले आहेत. मोदी अध्यक्षपदी परतल्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) राजस्थान क्रिकेट असोसिएशनवर निलंबनाची कारवाई केली आहे.
चार महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीचा निकाल मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केला. मोदींनी २४-५ अशा मताधिक्क्याने विजय मिळवत अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मान मिळवला. मोदी आणि बीसीसीआय यांच्यात गेले काही महिने कायदेशीर लढा सुरू होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेले निरीक्षक निवृत्त न्यायाधीश एन. एम. कासलीवाल यांनी मंगळवारी हा निकाल जाहीर केला. ३३ मतांपैकी मोदींचे प्रतिस्पर्धी रामपाल शर्मा यांना फक्त पाच मते मिळाली. निकाल जाहीर होण्याच्या काही तासांपूर्वीच बीसीसीआयने अनिश्चित काळासाठी निलंबनाची कारवाई करत आरसीएच्या कारभारावर देखरेख ठेवण्यासाठी अस्थायी समितीची नियुक्ती केली आहे.
‘‘सर्वोच्च न्यायालयाने ३० एप्रिल २०१४ रोजी दिलेल्या आदेशानुसार, जर एखादा व्यक्ती नियमांविरुद्ध वागत असेल किंवा कायदा मोडून आपले निर्णय लादत असेल तर त्या व्यक्तीवर कारवाई केली जाईल. त्याच आधारे बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष शिवलाल यादव यांनी आरसीएवर निलंबनाची कारवाई केली आहे. लवकरच अस्थायी समितीतील सदस्यांची नावे जाहीर करण्यात येतील,’’ असे बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी सांगितले. आरसीएने मात्र निलंबनाविरोधात न्यायालयीन लढा देण्याचे ठरवले आहे. ‘‘आम्ही परिस्थितीची चाचपणी करत असून लवकरच उच्च न्यायालयात याविषयी दाद मागणार आहोत,’’ असे आरसीएचे नवनियुक्त उपाध्यक्ष आणि मोदींचे वकील मेहमूद अब्दी यांनी सांगितले.
‘‘राजस्थानमधील क्रीडा आचारसंहितेचे आम्ही पालन करत आहोत. बीसीसीआय ही फक्त अधिकृत संस्था असल्यामुळे आम्ही आमची बाजू न्यायालयासमोर मांडणार आहोत. एका व्यक्तीसाठी संघटनेला निलंबित करणे चुकीचे आहे. काही सदस्य बीसीसीआयची विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यासाठी आग्रही असून या बैठकीत हा विषय मांडला जाणार आहे,’’ असेही अब्दी यांनी सांगितले.
आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे मोदी यांच्यावर बीसीसीआयने आजीवन बंदी घातली होती. गेल्या चार वर्षांपासून लंडनमध्ये वास्तव्यास असलेल्या मोदी यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षकाच्या देखरेखीखाली १९ डिसेंबर रोजी आरसीएची निवडणूक लढवण्याची परवानगी देण्यात आली होती. सोमेंद्र तिवारी हे सचिवपदी, तर पवन गोयल खजिनदार म्हणून निवडून आले.
ललित मोदी राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी
आयपीएलमधील गैरव्यवहारप्रकरणी आजीवन बंदी घालण्यात आलेले आयपीएलचे माजी वादग्रस्त अध्यक्ष ललित मोदी राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या (आरसीए) अध्यक्षपदी निवडून आले आहेत.
First published on: 07-05-2014 at 12:45 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lalit modi elected as rca president