राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या (आरसीए) गुरुवारी झालेल्या निवडणुकीत आपण अध्यक्षपदावर निर्विवादपणे वर्चस्व प्रस्थापित करू, अशी आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदी यांना खात्री आहे. परंतु तरीही या निकालासाठी सर्वाना ६ जानेवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मोदी यांच्यावर आजीवन बंदी घातली आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाने नेमलेले प्रधान निरीक्षक न्यायमूर्ती एन. एम. कासलीवाल यांच्या निर्देशानुसार मोदी ही निवडणूक लढवत आहेत. गुरुवारी मतदानानंतर मतपेटय़ा सर्वोच्च न्यायालयाकडे पाठविण्यात आल्या.
‘‘निरीक्षक या निवडणुकीचा निकाल सर्वोच्च न्यायालयाकडे सादर करतील. मग न्यायालय ६ जानेवारीला पुढील निर्णय घेईल,’’ अशी माहिती राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे वकील अभिनव शर्मा यांनी दिली. गुरुवारी आरसीए अकादमीमध्ये अतिशय शांतपणे मतदान झाले. ३३ जिल्हा क्रिकेट संघटनांना या निवडणुकीसाठी मतदानाचा अधिकार आहे. परंतु निकाल हा २९ मतदारांवर अवलंबून आहे, वादग्रस्त चार मतांचा विचार गरज पडल्यास होऊ शकेल.
उपाध्यक्षपदाच्या सहा जागांसाठी नऊ जण रिंगणार आहेत, तर संयुक्त सचिवपदाच्या चार जागांसाठी सात जण आपले नशीब आजमावत आहे. याचप्रमाणे चार संयोजन सचिवपदासाठी सहा जण रिंगणात आहेत. कार्यकारिणी सदस्यपदासाठी फक्त तिघांनी उमेदवारी अर्ज भरल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोदी हे रामपाल सिंग यांना पराभूत करून निवडून आल्यास राजस्थान क्रिकेट असोसिएशनवर निलंबनाची कारवाई होऊ शकते. २००५मध्ये मोदी अध्यक्षपदावर निवडून आले होते.

Story img Loader