आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदी यांच्यावर आजीवन बंदी घालण्याचा विचार भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) करत असून २५ सप्टेंबरला चेन्नईत होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये हा निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे.
बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार रविवारी झालेल्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीमध्ये ज्योतिरादित्य सिंदिया आणि अरुण जेटली यांच्या शिस्तपालन समितीने याबाबतचा अहवाल सादर केला असून त्याच्यावर चर्चा करून चेन्नईतील बैठकीमध्ये मोदींच्या आजीवन बंदीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
‘‘शिस्तपालन समितीने दिलेल्या अहवालामध्ये ललित मोदी यांच्यावर आजीवन बंदी घालण्यात यावी, असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. चेन्नईमध्ये २५ सप्टेंबरला या विषयाची चर्चा विशेष सर्वसाधारण सभेमध्ये करण्यात येणार असून याबाबतचा निर्णय घेण्यात येईल,’’ असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
मोदी यांच्यावर आजीवन बंदी घालण्याच्या बाजूने दोनतृतीयांश मते असली तरच हा निर्णय बैठकीमध्ये घेता येऊ शकतो, म्हणजेच किमान २१ मते मोदी यांच्यावर बंदी घालण्यात यावी, या बाजूने असतील तरच तसा निर्णय घेता येऊ शकतो.
मोदी यांच्याकडे आयपीएलचे अध्यक्षपद आणि कमिशनरपद आयपीएलच्या पहिल्या तीन मोसमात होते. पण २०१० सालच्या आयपीएलच्या समारोप सोहळ्यानंतर आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी त्यांना निलंबित करण्यात आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा