इंडियन प्रीमियर लीग ( आयपीएल ) चे ‘गॉडफादर’ म्हणून ओळखले जाणारे ललित मोदी नव्या कारणाने चर्चेत आले आहेत. आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी भारतीय क्रिकेट नियंत्रण बोर्ड ( बीसीसीआय ) कडून ललित मोदी यांच्यावर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर ललित मोदी हे भारत सोडून विदेशात फरार झाले आहेत. त्यातच आता ललित मोदी यांनी ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांना धमकी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत ललित मोदी यांनी पोस्ट लिहिली आहे. ललित मोदी म्हणाले, “आदरणीय रोहतगीजी, मी कधी तुमचा वापर केला नाही, किंवा तुमचा नंबर माझ्या जवळ नाही. मी तुमचा नेहमीच सन्मान केला आहे. पण, तुमच्याकडे फक्त तिरस्कार आहे. मला फरारी म्हणू नका. जर कोणत्या न्यायालयाने म्हटलं असतं, मी काही बोलणार नाही. पण, पुन्हा बोललात तर विनम्रपणे सांगणार नाही,” असं ललित मोदी म्हणाले.

“जीवन खूप छोटं आहे. सगळीकडे धोका आहे. मोठी लोक जगातील कोणत्याही शहरात पायी चालत असतात. अलिकडेच बसने मला धडक दिली होती. पण, थोडक्यात वाचलो आहे. तुम्ही माझं प्रतिनिधित्व करण्याची काही गरज नाही. त्यासाठी माझ्याकडे सर्वांत चांगले हरिश साळवे आहेत. मी देवाचा लाकडा मुलगा आहे. ते माझं संरक्षण करतात,” असं ललित मोदींनी म्हटलं.

“रातोरात्र न्यायाधीशांना विकत घेऊन तुमच्या अशिलाला न्याय देत असाल. परंतु, मी तुम्हाला लाखो वेळा खरेदी करुन विकू शकतो. तुम्ही तुमच्या अशिलासाठी कितीही लढू शकता, पण माझा उल्लेख ‘मिस्टर मोदी’च कराल. तुम्ही माझ्यासाठी मुंगीसारखे आहात. मात्र, तुमचं नशीब आहे, मला मुंग्या आवडतात. त्यामुळे मी तुम्हाला चिरडणार नाही. पण, प्रिंट किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांत तुम्ही माझ्याबद्दल काही बोलल्याचं कळलं, तर मी तुमच्या मागोमाग न्यायालयात येणार. जय हिंद,” अशी धमकीच ललित मोदींनी दिली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lalit modi threaten mukul rohatgi against calling him fugitive ssa