महाराष्ट्राचे आशास्थान असलेल्या ललिता बाबर व स्वाती गाढवे यांनी पाच हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळवीत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील अॅथलेटिक्समध्ये समाधानकारक कामगिरी केली.
फुटबॉलमध्ये महाराष्ट्राला कांस्यपदक मिळाले.
सोमवारी सुरू झालेल्या अॅथलेटिक्स स्पर्धेत केरळची आंतरराष्ट्रीय खेळाडू ओ.पी. जैशाने पाच हजार मीटर धावण्यात सोनेरी कामगिरी केली. तिने हे अंतर १५ मिनिटे ३१.३७ सेकंदांत पार केले. रौप्यपदक विजेत्या ललिताला हे अंतर पार करण्यास १५ मिनिटे ४६.७३ सेकंद वेळ लागला. स्वातीने ही शर्यत १६ मिनिटे २६.०६ सेकंदांत पार केली. केरळचा आंतरराष्ट्रीय खेळाडू रंजित माहेश्वरीकडून लांब उडीत विक्रमासह सुवर्णपदकाची अपेक्षा होती, मात्र पात्रता फेरीतच तीन वेळा फाऊल केल्यामुळे त्याला बाद व्हावे लागले.
ट्रायथलॉनमध्ये रौप्य
महाराष्ट्राने महिलांच्या सांघिक ट्रायथलॉनमध्ये रौप्यपदक मिळविले. महाराष्ट्र संघात तेजश्री नाईक, एच.पी.चैत्राली व पूनम वरखडे यांचा समावेश होता. या स्पर्धेत १५०० मीटर पोहणे, ४० किलोमीटर सायकलिंग व १० किलोमीटर धावणे या क्रीडाप्रकारांचा समावेश होता. गुजरातने सुवर्णपदक मिळविले. त्यांच्या पूजा पौरुषीने वैयक्तिक विभागातही सुवर्णपदक पटकाविले.
फुटबॉलमध्ये कांस्य
महाराष्ट्राच्या खेळाडूंनी कौतुकास्पद कामगिरी करीत पुरुषांच्या फुटबॉलमध्ये कांस्यपदक पटकाविले. तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीत त्यांनी गोवा संघावर ३-१ अशी मात केली. महाराष्ट्राकडून महंमद ईर्शाद व सिद्धार्थ नायक यांनी सुरेख खेळ केला.
बॅडमिंटनमध्ये संमिश्र यश
महाराष्ट्राला बॅडमिंटनमध्ये संमिश्र यश मिळाले. महाराष्ट्राच्या महिला संघाला उपांत्य फेरीत केरळविरुद्ध ०-२ अशी हार पत्करावी लागली. त्याआधी त्यांनी आसामवर २-० अशी मात केली होती. पुरुषांच्या विभागात महाराष्ट्राने उत्तराखंडविरुद्ध ३-१ असा विजय मिळविला.
कबड्डीत विजयी प्रारंभ
पदकासाठी दावेदार असलेल्या महाराष्ट्राने कबड्डीतील महिलांच्या विभागात विजयी प्रारंभ केला. मात्र त्यांना आंध्र प्रदेशविरुद्ध २३-१९ असा विजय मिळविताना संघर्ष करावा लागला.
बास्केटबॉलमध्ये आगेकूच
महाराष्ट्राने बास्केटबॉल स्पर्धेतील महिलांच्या गटात आगेकूच राखली. त्यांनी कर्नाटक संघावर ७२-५१ अशी मात केली. आक्रमक खेळामुळे हा सामना शेवटपर्यंत रंगतदार झाला. महाराष्ट्राने सुरुवातीपासून खेळावर नियंत्रण ठेवीत विजयश्री संपादन केली. पूर्वार्धात त्यांनी ३०-२७ अशी केवळ तीन गुणांची आघाडी घेतली होती. उत्तरार्धात त्यांनी वेगवान खेळ करीत सहज विजय मिळविला.
हँडबॉलमध्ये आव्हान कायम
महाराष्ट्राने हँडबॉलमधील महिलांच्या गटात आव्हान राखले. त्यांनी दिल्ली संघावर ३०-१९ असा विजय मिळविला. पूर्वार्धात
महाराष्ट्राने १७-११ अशी आघाडी घेतली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा