महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबरने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या तीन हजार मीटर अडथळा शर्यतीमध्ये सुवर्णपदक जिंकले आणि आपल्या नावलौकिकास साजेशी कामगिरी केली. तिची सहकारी जयश्री बोरगेने याच शर्यतीत कांस्यपदक मिळविले, तर सचिन पाटीलने पुरुषांच्या अडथळा शर्यतीमध्ये कांस्यपदक जिंकले. स्पर्धेअखेर महाराष्ट्राने एकूण १२३ पदकांसह चौथे स्थान मिळवले.
ललिताने तीन हजार मीटर अंतराची अडथळा शर्यत नऊ मिनिटे ४२.६३ सेकंदांत जिंकताना आपली प्रतिस्पर्धी व आंतरराष्ट्रीय खेळाडू सुधा सिंग हिच्यावर मात केली. सुधा सिंगने हे अंतर १० मिनिटे ४.३० सेकंदात पार करीत रौप्यपदक पटकाविले. महाराष्ट्राच्या जयश्री हिने हे अंतर १० मिनिटे २८.४४ सेकंदात पूर्ण केले. ललिताने याआधी या स्पर्धेतील पाच हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक मिळविले होते.
‘‘राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदकाची खात्री होती, पण त्याचबरोबर जागतिक स्पर्धेची पात्रता पूर्ण केल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. आता जागतिक स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी मी कठोर परिश्रम करणार आहे,’’ असे ललिताने सांगितले.
पुरुषांमध्ये नवीनकुमार याने तीन हजार मीटर अडथळा शर्यत आठ मिनिटे ५२.५४ सेकंदांत जिंकली. त्याचाच सहकारी जयवीर सिंगला (८ मिनिटे ५४.६७ सेकंद) रौप्यपदक मिळाले. सचिन पाटीलने ही शर्यत ९ मिनिटे २७ सेकंदांत पार केले.
रग्बीत महिलांना रौप्य
महाराष्ट्राच्या महिला संघाला रग्बी स्पर्धेतील अंतिम लढतीत ओडिशास ५-१७ असा पराभव स्वीकारावा लागला. पुरुषांच्या गटात महाराष्ट्राने कांस्यपदकाच्या लढतीत पश्चिम बंगाल संघावर २९-५ अशी मात केली.
कबड्डीत रौप्य
महाराष्ट्राच्या महिला कबड्डी संघाला अंतिम लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले. हरयाणाने महाराष्ट्रावर २०-१७ असा निसटता विजय मिळवला. सुवर्णपदक पटकावण्याची महाराष्ट्राची संधी थोडक्यात हुकली.