रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत देशवासीयांना अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या ललिता बाबरचे मंगळवारी थाटामाटात लग्न झाले. सरकारी अधिकारी संदीप भोसले आणि ललिता यांचा विवाह सोहळा साताऱ्यात चर्चेचा विषय ठरला. या लग्नासाठी यशोदा टेक्निकल इन्स्टिटय़ूटच्या मैदानावर शाही मंडप उभारण्यात आला होता. वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांसह राजकीय, क्रीडा, शिक्षण अशा असंख्य क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. संदीप भोसले घोडय़ावरून तर ललिताचे मेण्यातून मंडपात आगमन झाले. भारतीय अॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला सोहळ्याकरिता उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील मोही गावच्या ललिताने प्रतिकूल परिस्थितीला टक्कर देत वाटचाल केली. २०१५ मध्ये ललिताने आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. या प्रदर्शनाद्वारे ललिताने रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचा मान पटकावला. ऑलिम्पिक स्पर्धेत, ललिताने स्टीपलचेस प्रकारात अंतिम फेरी गाठली होती. या प्रकारात अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी पहिली महिला धावपटू ठरणाऱ्या ललिताने अंतिम फेरीत आठवे स्थान मिळवले. गेल्या वर्षी ललिताला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.