बॉल टॅम्परिंग प्रकरणानंतर, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने माजी खेळाडू जस्टीन लँगरची संघाच्या प्रशिक्षकपदावर नेमणूक केली आहे. पुढील चार वर्षांसाठी तिन्ही प्रकारांमध्ये लँगर ऑस्ट्रेलियाचा प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे. यावेळी बॉल टॅम्परिंग प्रकरणात बंदीची शिक्षा भोगत असलेल्या स्टिव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरुन बँक्रॉफ्ट हे खेळाडू पुन्हा संघात पुनरागमन करु शकतात असं वक्तव्य केलं आहे. बॉल टॅम्परिंग प्रकरणानंतर ऑस्ट्रेलियाचे माजी प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांनी पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता.
“कॅमरुन आणि स्टिव्ह स्मिथ हे क्रिकेटवर खऱ्या अर्थाने प्रेम करतात. त्यांच्याकडून अशा प्रकारची चूक होणं हा माझ्यासाठी आश्चर्याचा धक्का होता, मात्र चुका कोणाकडून होत नाहीत?? आपण सर्वजण कधी ना कधी चुका करत असतो. वॉर्नरच्याही हातून चूक झाली आहे, मात्र त्याने आपली चूक मान्य करुन मोठेपणा दाखवला आहे. मात्र आगामी काळात या तिन्ही खेळाडूंच्या खेळामध्ये मोठी सुधारणा होण्यासाठी वाव आहे. ही तयारी या खेळाडूंनी दर्शवली तर त्यांचं संघात स्वागत आहे.” पत्रकार परिषदेत लँगर प्रसारमाध्यांशी संवाद साधत होता.
BREAKING: Justin Langer unveiled as the new head coach of the Australian men's team across all three formats https://t.co/JdWrqdw1Gl
— cricket.com.au (@CricketAus) May 2, 2018
बॉल टॅम्परिंग प्रकरणानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाची प्रतिमा डागाळली होती. मात्र आपल्या कार्यकाळात ऑस्ट्रेलियाचा संघ ज्या खेळासाठी ओळखला जायचा तो आदर मला संघासाठी परत मिळवून द्यायचा आहे. त्यामुळे आगामी काळात ऑस्ट्रेलियाचा संघ जस्टीन लँगरच्या मार्गदर्शनाखाली कसा खेळ करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.