ऑस्ट्रेलियाने महिलांच्या क्रिकेटवरील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. रविवारी ऑस्ट्रेलियाच्या महिलांनी आयसीसी ट्वेन्टी-२० विश्वचषकाची हॅट्ट्रिक साधताना इंग्लंडचा सहा विकेट राखून पराभव केला.
ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंगने ३० चेंडूंत ४ चौकार व दोन षटकारांसह ४४ धावांची दमदार खेळी साकारली. त्यामुळे १०६ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने २९ चेंडू राखून आरामात गाठले.
मध्यमगती गोलंदाज नताली शिव्हेरच्या गोलंदाजीवर विजयी फटका खेळण्याच्या प्रयत्नात लॅनिंग बाद झाली. तिने इलिसे पेरी (नाबाद ३१) हिच्यासोबत तिसऱ्या विकेटसाठी ६० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.
त्याआधी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडला ८ बाद १०५ धावसंख्येवर रोखले. मध्यमगती गोलंदाज सराह कॉयटेने ४ षटकांत १६ धावांत ३ बळी घेतले. इंग्लंडकडून हिदर नाइटने २४ चेंडूंत ३ चौकारांनिधी २९ धावा केल्या. पेरीने गोलंदाजीतही चमक दाखवताना १३ धावांत २ बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड : २० षटकांत ८ बाद १०५ (हिदर नाइट २९, सराह टेलर १८; सराह कॉयटे ३/१६, इलिसे पेरी २/१३) पराभूत वि. ऑस्ट्रेलिया : १५.१ षटकांत ४ बाद १०६ (मेग लॅनिंग ४४, इलिसे पेरी ३१; नताली शिव्हेर २/१२)
सामनावीर : सराह कॉयटे (ऑस्ट्रेलिया).
मालिकावीर : अ‍ॅनिया श्रृबसोले (इंग्लंड).

Story img Loader