Jwala Gutta Slams L&T Chairman : कालपासून देशभरात लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष एसएन सुब्रह्मण्यम यांनी कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासांबद्दल केलेल्या विधानाची जोरदार चर्चा होत आहे. एसएन सुब्रह्मण्यम यांनी, पत्नीकडे पाहत बसण्यापेक्षा कर्मचाऱ्यांनी रविवारीही काम करावे असे म्हटले होते. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना आठवड्यातून ९० तास काम करण्याचाही सल्ला दिला होता. त्यांचे हे विधान सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वच क्षेत्रातील मान्यवर यावर टीका करत आहेत. अशात आता भारताची माजी दिग्गज बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टानेही एसएन सुब्रह्मण्यम यांच्या विधानावर संताप व्यक्त करत, “कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पत्नीकडे का पाहू नये?” असे म्हटले आहे.
लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष एसएन सुब्रह्मण्यम कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना म्हणाले होते की, “कर्मचाऱ्यांनी रविवारी करायला न लावण्याचा मला पश्चातप आहे. त्यांनी रविवारी पत्नीकडे पाहत बसण्यापेक्षा काम करावे.”
पत्नीकडे का पाहू नये?
एसएन सुब्रह्मण्यम यांच्या या विधानावर संताप व्यक्त करत ज्वाला गुट्टा म्हणाली, “त्याने (कर्मचाऱ्याने) आपल्या पत्नीकडे का पाहू नये? हे दुःखद आहे की, इतके सुशिक्षित आणि मोठ्या संस्थांच्या सर्वोच्च पदांवर असलेले लोकही मानसिक आरोग्य आणि विश्रांतीला गांभीर्याने घेत नाहीत. ते अशी महिलाद्वेषी विधाने करत स्वतःलाच उघडे पाडत आहेत. हे निराशाजनक आणि भयानक आहे!”
किती वेळ पत्नीकडे पाहणार?
कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष एसएन सुब्रह्मण्यम म्हणाले होते की, “रविवारी मी तुम्हाला काम करायला लावत नाही याचा मला पश्चात्ताप आहे. जर मी तुम्हाला रविवारी काम करायला सांगितले तर मला जास्त आनंद होईल, कारण मीसुद्धा रविवारी काम करतो.”
ते पुढे म्हणाले होते की, “रविवारी घरी बसून तुम्ही काय करता? तुम्ही तुमच्या पत्नीकडे किती वेळ पाहणार? पत्नी तुमच्याकडे किती वेळ पाहणार? त्यापेक्षा कार्यालयात या आणि कामाला लागा.”
हर्ष गोयंका, दीपिका पादुकोणने फटकारले
एसएन सुब्रह्मण्यम यांच्या विधानानंतर उद्योगपती हर्ष गोयंका यांनी एक्सवर एक पोस्ट लिहिली आहे. ते म्हणाले, “आठवड्यातून ९० तास काम करायचे का? रविवारचे नाव बदलून ‘सन-ड्युटी’ का ठेऊ नये? चांगले आणि स्मार्ट काम करण्यावर माझा विश्वास आहे, पण आयुष्याला कायमचे ऑफिस शिफ्टमध्ये बदलायचे का? हा बर्नआउटचा एक प्रकार आहे, यशाचा नाही.” या पोस्टबरोबर गोयंका यांनी #WorkSmartNotSlave असा हॅश टॅगही वापरला आहे.
यावर अभिनेत्री दीपिका पदुकोणनेही प्रतिक्रिया दिली आहे. दीपिकाने सोशल मीडिावर पोस्ट करत, इतक्या वरिष्ठ पदावरील लोक अशी विधाने करतात हे धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. तसेच तिने यावेळी मानसिक आरोग्याचा मुद्दा देखील उपस्थित केला आहे.