२-१ असा विजय; सुआरेझ व नेयमारचा गोल

सातत्यपूर्ण कामगिरी करून जेतेपदावर शिक्कामोर्तब करण्याच्या वाटेवर असलेल्या गतविजेत्या बार्सिलोना क्लबला लिंबुटिंबू क्लबमध्ये गणल्या जाणाऱ्या लास पाल्मसने शनिवारी विजयासाठी झुंंजवले. ला लिगा फुटबॉल स्पध्रेतील या लढतीत बार्सिलोनाने २-१ असा विजय मिळवून दादागिरी सिद्ध केली असली तरी पाल्मसच्या चिकाटीपुढे त्यांची दमछाक झाली. या विजयाबरोबर बार्सिलोनाने २५ सामन्यांनंतर ६३ गुणांसह अव्वल स्थानावरील पकड अधिक मजबूत केली.

जेतेपदाच्या शर्यतीत अ‍ॅटलेटिको माद्रिद आणि रिअल माद्रिद या बलाढय़ संघाचे आव्हान असूनही बार्सिलोनाने सातत्यपूर्ण खेळ केला आहे. शनिवारी याची प्रचिती पुन्हा पाहायला मिळाली. जबरदस्त फॉर्मात असलेल्या लुईस सुआरेझने सहाव्या मिनिटाला बार्सिलोनाचे खाते उघडले. जॉर्डी अल्बा रॅमोसच्या पासवर सुआरेझने पहिला गोल केला. परंतु अवघ्या चार मिनिटांत लास पाल्मसने बरोबरी मिळवून बार्सिलोनाला थक्क केले. १०व्या मिनिटाला जोस डी सिल्व्हाने गोल करून सामना १-१ असा बरोबरीत आणला. ३९व्या मिनिटाला नेयमारने गोल करून बार्सिलोनाला पहिल्या सत्रात २-१ अशी आघाडी मिळवून दिली. या आघाडीत बार्सिलोना मध्यंतरानंतर आणखी भर टाकेल अशी अपेक्षा होती, परंतु पाल्मसने त्यांना अपयशी ठरवले. एरवी प्रतिस्पर्धीवर हुकूमत गाजवणारा बार्सिलोनाचा संघ पाल्म्सची बचावफळी भेदण्यात अपयशी ठरत होता. सुआरेझ, नेयमार आणि लिओनेल मेस्सी हे गोलचा पाऊस पाडणारे त्रिकुटही आज निष्प्रभ ठरले. अखेरीस बार्सिलोनाला २-१ अशा विजयावरच समाधान मानावे लागले.

निराशाजनक कामगिरीनंतरही बार्सिलोनाचा प्रशिक्षक लुईस एन्रिक यांनी क्लबची पाठराखण केली. ‘‘संघाची कामगिरी समाधानकारक झाली नाही, असे मला अजिबात वाटत नाही. संघाच्या कामगिरीवर मी समाधानी आहे.’’

ला लिगा फुटबॉल स्पध्रेतील २०१६ या वर्षांत बार्सिलोनाकडून लुईस सुआरेझने सर्वाधिक १० गोल केले आहेत. त्यापाठोपाठ नऊ गोल करणाऱ्या मेस्सीचा क्रमांक येतो. 

Story img Loader