‘स्पॉट फिक्सिंग’ प्रकरणी तीन खेळाडूंच्या अटकेमुळे धक्का बसलेल्या राजस्थान रॉयल्सला पुन्हा प्रतिष्ठ मिळविण्यासाठी शुक्रवारी हैदराबाद सनराइजविरुद्ध पराभवाची प्रतीक्षा आहे. ‘स्पॉट फिक्सिंग’ च्या आरोपाखाली संघातील एस.शांताकुमारन श्रीशांत, अंकित चव्हाण व अजित चंदेला या तीन खेळाडूंना अटक केल्यामुळे राजस्थान संघास जबरदस्त धक्का बसला आहे. राजस्थानने २० गुणांसह उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला आहे. तथापि उद्याची लढत जिंकून आपली बाजू बळकट करण्याची अखेरची संधी आहे. हैदराबाद व बंगळुरु यांचे प्रत्येकी सोळा गुण असून प्लेऑफ गटात स्थान मिळविण्यासाठी त्यांना उर्वरित सर्व सामनेजिंकणे आवश्यक आहे. त्यांचे प्रत्येकी सोळा गुण आहेत. हैदराबादचे दोन सामने बाकी असून बंगळुरुचा एकच सामना बाकी आहे.
हैदराबाद संघाकडे डेल स्टेन, इशांत शर्मा, डॅरेन सामी, अमित मिश्रा, थिसारा परेरा व करण शर्मा आदी प्रभावी गोलंदाजांचा ताफा आहे. त्यांच्या गोलंदाजीची बाजू आयपीएलमधील सर्वोत्तम बाजू मानली जात आहे. मात्र त्यांच्या गोलंदाजांचा मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी खरपूस समाचार घेतला आहे.
राजस्थानची शेन वॉटसन, अजिंक्य रहाणे, कर्णधार राहुल द्रविड, स्टुअर्ट बिन्नी यांनी फलंदाजीत सातत्य दाखविले आहे. गोलंदाजीत त्यांची मुख्य मदार वॉटसन, ब्रॅड हॉग, सिद्धार्थ त्रिवेदी,जेम्स फॉल्कनर यांच्यावर आहे.
सामना : राजस्थान रॉयल्स वि. सनरायजर्स हैदराबाद
स्थळ : राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद
वेळ : रात्री ८ वाजल्यापासून.

Story img Loader