क्रिकेटमध्ये कोणत्याही खेळाडूला कमजोर समजू नये, तो अशी काही खेळी करू शकतो की समोरच्याची त्रेधातिरपीट उडू शकते, असेच काहीसे घडले ते भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी. दीडशतकाच्या दिशेने कूच करणारा मुरली विजय सदोष पंचगिरीचा बळी ठरला, तर कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा धावताना आत्मघात झाला आणि त्याचे हुकले. या गोष्टींमुळे निराश झालेल्या भारतीयांना भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी या अखेरच्या जोडीने शतकी भागीदारी रचत दिलासा दिला, तर इंग्लंडच्या गोलंदाजांना त्यांनी झुंजायला लावले. या दोघांनी इंग्लंडला चांगलेच तंगवत अर्धशतके झळकावली आणि त्यामुळे भारताला पहिल्या डावात ४५७ धावांपर्यंत मजल मारता आली. दिवसअखेर इंग्लंडची १ बाद ४३ अशी स्थिती असून ते ४१४ धावांनी पिछाडीवर आहेत.
तत्पूर्वी, दुसऱ्या दिवसाची संयमी सुरुवात विजय आणि धोनी यांनी करून दिली. मुरलीने दीडशतकाच्या दिशेने कूच करायला सुरुवात केलीच होती, पण अखेर पंचांच्या सदोष कामगिरीचा फटका भारताला मुरलीच्या रूपात बसला. उजव्या यष्टीच्या बाहेर पडलेला चेंडू मुरलीच्या पॅडच्याही वर लागला. चेंडू स्टम्पच्या वरून जात असल्याचे जाणवत असले तरी पंचांनी फलंदाजाच्या बाजूने निर्णय द्यायचा सोडून त्याला बाद करीत इंग्लंडवर कृपा केली. निराश, हतबल विजयने मैदानातून बाहेर पडताना नाराजी दर्शवली खरी, पण त्याचा काहीच फायदा होणार नव्हता. विजयने २५ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर १४६ धावांची अप्रतिम खेळी साकारली.
विजय बाद झाल्यावर फलंदाजीला आलेल्या रवींद्र जडेजाने (२५) इंग्लंडच्या गोलंदाजांवर थेट आक्रमण करायला सुरुवात केली, पण ती क्षणभंगुर ठरली. उपाहारानंतरच्या दुसऱ्याच षटकात जडेजा चुकीचा फटका मारून बाद झाला. आता धोनीवर सर्व मदार होती, पण त्यानंतरच्या दुसऱ्याच षटकात तो धावचीत झाला. त्यामुळे त्याचा दीड वर्षांतील शतकाचा दुष्काळ कायम राहिला. धोनीने ७ चौकारांच्या जोरावर ८२ धावांची खेळी साकारली. धोनी बाद झाल्यावर भारताची पडझड सुरू झाली, पण भुवनेश्वर (५८) आणि शमी (नाबाद ५१) या अखेरच्या जोडीने १११ धावांची भागीदारी रचत इंग्लंडच्या गोलंदाजांचा झगडायला लावले. इंग्लंडविरुद्धची दहाव्या विकेटसाठी ही सर्वोत्तम भागीदारी ठरली आहे. भुवनेश्वरने १५७व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर एकेरी धाव घेत, तर त्यानंतरच्या चेंडूवर षटकार ठोकत शमीने कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले.
इंग्लंडच्या पहिल्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. चौथ्या षटकात शमीचा चेंडू सोडताना कर्णधार अॅलिस्टर कुकचा (५) त्रिफळाभेद झाला आणि त्यांची १ बाद ९ अशी अवस्था झाली. पण त्यानंतर सॅम रॉबसन (नाबाद २०) आणि गॅरी बॅलन्स (नाबाद १५) यांनी इंग्लंडचा डाव सावत दिवस खेळून काढण्याची जबाबदारी पार पाडली.
संक्षिप्त धावफलक
भारत (पहिला डाव) : १६१ षटकांत सर्व बाद ४५७ (मुरली विजय १४२, महेंद्रसिंग धोनी ८२, भुवनेश्वर कुमार ५८, मोहम्मद शमी नाबाद ५१; जेम्स अँडरसन ३/१२३).
इंग्लंड (पहिला डाव) : १७ षटकांत १ बाद ४३ (सॅम रॉबसन नाबाद २०; मोहम्मद शमी १/१५).
शेपटाने तंगवले
क्रिकेटमध्ये कोणत्याही खेळाडूला कमजोर समजू नये, तो अशी काही खेळी करू शकतो की समोरच्याची त्रेधातिरपीट उडू शकते, असेच काहीसे घडले ते भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी.
First published on: 11-07-2014 at 05:34 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Last wicket stand puts india in driving seat