ऑलिम्पिकसाठी टेनिस संघ निवडीवरून झालेल्या तमाशात रोहन बोपण्णा केंद्रस्थानी होता. या वादाने भारतीय टेनिसची प्रतिमा डागाळली, मात्र असे असूनही यंदाचे वर्ष माझ्यासाठी सर्वोत्तम असल्याचे उद्गार टेनिसपटू रोहन बोपण्णाने काढले.  
या वर्षांत अनेक चढ-उतार पाहिले, मात्र तरीही हे वर्ष माझ्यासाठी चांगले गेले, असे बोपण्णाने सांगितले. ‘पॅरिस मास्टर्स जेतेपद मी कायम राखले, प्रतिष्ठेच्या वर्ल्ड टूर फायनल्समध्ये धडक मारली आणि ऑलिम्पिकमध्येही सहभागी झालो. दुबईतील टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले आणि मास्टर्स दर्जाच्या दोन स्पर्धाच्या अंतिम फेरीत धडक मारली, त्यामुळे माझ्यासाठी हे वर्ष संस्मरणीय आहे,’ असे तो पुढे सांगतो.
ऑलिम्पिकसाठी भारतीय टेनिस संघाच्या निवडीवरून झालेल्या वादात बोपण्णाने लिएण्डर पेससह खेळण्यास नकार दिला होता. भूपती-बोपण्णा जोडीच्या हट्टापुढे नमते घेत अखिल भारतीय टेनिस संघटनेने ऑलिम्पिकला दोन जोडय़ा पाठविण्याचा निर्णय घेतला. ऑलिम्पिक हेच उद्दिष्ट ठेवून सराव करणाऱ्या भूपती-बोपण्णाला ऑलिम्पिकमध्ये प्राथमिक फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. संघनिवडीवेळी आडमुठय़ा भूमिकेमुळे टेनिस संघटनेने बोपण्णा-भूपतीचा २०१४ डेव्हिस चषकापर्यंत भारतीय संघनिवडीसाठी विचार केला जाणार नाही, अशी भूमिका घेतली. बोपण्णाचे डेव्हिस चषकातील भवितव्य टेनिस संघटनेच्या हाती आहे.
पॅरिस मास्टर्स आणि दुबई टेनिस स्पर्धाची जेतेपदांसह बोपण्णाने कारकिर्दीतील दुहेरी जेतेपदांची संख्या सातवर नेली. चेन्नई खुल्या टेनिस स्पर्धेत बोपण्णा अमेरिकेच्या राजीव रामच्या साथीने खेळणार आहे. या स्पर्धेत मुकाबला नेहमीच खडतर असतो. भूपती डॅनियल नेस्टरच्या, तर पेस रॉजर व्ॉसेलिनच्या साथीने खेळणार आहे, त्यामुळे जेतेपदापर्यंतचा प्रवास आव्हानात्मक आहे, असे बोपण्णाने प्रांजळपणे सांगितले.
रामसह माझी ही पहिलीच स्पर्धा आहे, एकमेकांचा खेळ समजून घेऊन चांगली सुरुवात करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे बोपण्णाने सांगितले. चेन्नईला माझ्या कारकिर्दीत महत्त्वाचे स्थान आहे. याच शहरातून मी कारकिर्दीची सुरुवात केली. येथेच मी पहिल्यांदा एकेरीचे राष्ट्रीय जेतेपद पटकावले. डेव्हिस चषकात भारताने ब्राझीलवर मात केली, ते सामनेही चेन्नईतच झाले होते. या शहराशी असंख्य आठवणी जोडलेल्या आहेत, असे त्याने पुढे सांगितले.

Story img Loader