भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लता मंगेशकर यांचे क्रिकेटवर विशेष प्रेम होते. त्यांना क्रिकेट पाहण्याची आवड होती. कपिल देव, सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर ते महेंद्रसिंह धोनीपर्यंत लताजींचे आवडते खेळाडू राहिले आहेत. क्रिकेटशीही त्यांचे खूप जवळचे नाते होते. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष राजसिंह डुंगरपूर हे त्यांचे जवळचे मित्र होते. लताजींना भारतरत्न जाहीर झाल्याची बातमी आली तेव्हा राज सिंह त्यांच्यासोबत डुंगरपूर लंडनमध्ये होते.
१९८३ मध्ये भारताला पहिल्यांदा विश्वचषक जिंकण्यात यश आले होते. त्या विश्वचषकाशी संबंधित एक घटना लता मंगेशकर यांच्याशी संबंधित आहे. विश्वचषकाच्या फायनलपूर्वी त्यांनी संघाला जेवणाचे निमंत्रण दिले होते. लताजींनी लॉर्ड्सवर भारत आणि वेस्ट इंडिजचा अंतिम सामनादेखील पाहिला होता. जिंकल्यानंतर त्यांनी भारतीय संघाला पुन्हा जेवणासाठी बोलावले.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं खरं नाव माहितीये का?
लता मंगेशकर लंडनहून आल्यानंतर दिल्लीतील इंद्रप्रस्थ स्टेडियममध्ये आयोजित केलेल्या कॉन्सर्टमध्ये सहभागी होऊन २० लाख रुपये जमा केले होते. ही चार तासांची मैफल होती. यावेळी लता मंगेशकर यांचे भाऊ हृदयनाथ यांनी भारतीय संघासाठी खास एक गाणे तयार केले, जे सर्व सदस्यांनी गायले होते. मैफल संपल्यानंतर संघातील सदस्यांना प्रत्येकी एक लाख रुपये देण्यात आले. त्याकाळी खेळाडूंना कमी पैसे मिळायचे. २०११ मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या संघातील सर्व सदस्यांना बीसीसीआयकडून प्रत्येकी दोन कोटी रुपये मिळाले होते.
लताजींनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्या घटनेची सविस्तर माहिती दिली होती. “सामन्यापूर्वी तणावपूर्ण वातावरण होते. हळूहळू सामना पुढे सरकत होता आणि माझ्यात विजयाचा आत्मविश्वास वाढत होता. मात्र, क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की, कधी काय होईल हे कळत नाही. कधीही सामना फिरू शकतो. सामन्यापूर्वी मी संपूर्ण संघाला भेटले. आपणच सामना जिंकू असे सर्व खेळाडूंनी सांगितले, असे लता मंगशेकर म्हणाल्या होत्या.
पैसे गोळा करण्यासाठी कार्यक्रम
लता मंगेशकर यांनी पुढे सांगितले की, त्यावेळी भारतीय बोर्डाकडे पुरेसे पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी खास मैफल केली. “मी १९८३ मध्ये लंडनला सुट्टीसाठी गेले होते. तिथे एन.के.पी.साळवे यांची भेट झाली. जेव्हा भारतीय संघ जिंकल तेव्हा त्यांनी मला सांगितले की, त्यांना या विजयासाठी मोठा कार्यक्रम करायचा आहे. मग त्यांनी मला विचारले की तू कार्यक्रम करशील का? मी हे मान्य केले,” असे लता मंगेशकर म्हणाल्या.
“१७ ऑगस्टला दिल्लीला पोहोचल्यानंतर मी कॉन्सर्टमध्ये भाग घेतला. कार्यक्रमाला मुकेश भैय्या (प्रसिद्ध गायक मुकेश) यांचा मुलगा नितीन मुकेश आणि सुरेश वाडेकर यांनी साथ दिली. त्या कार्यक्रमाला राजीव गांधीही उपस्थित होते. तो शो जबरदस्त होता. माझ्या भावाने संगीतबद्ध केलेले गाणे संपूर्ण टीमने गायले तेव्हा सर्वात खास क्षण होता. तेव्हाच मला कळले की जे लोक बॅट आणि बॉलने अप्रतिम खेळ करतात तेही चांगले गातात,” असे लता मंगेशकर यांनी म्हटले होते.