ड्वेन स्मिथची भेदक गोलंदाजी आणि दणकेबाज अर्धशतकी खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जच्या विजयाचे ‘स्मित’ फुलले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या सनरायजर्स हैदराबादने चेन्नईपुढे १४६ धावांचे आव्हान ठेवले होते. स्मिथच्या तडफदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर चेन्नईने हे आव्हान ५ विकेट्स राखून पूर्ण करत हैदराबादवर विजय साकारला.
हैदराबादच्या आव्हानाचा पाठलाग करताना ड्वेन स्मिथ आणि ब्रेन्डन मॅक्क्युलम (४०) यांनी ८५ धावांची दमदार सलामी देत संघाला विजय सुकर करून दिला. मॅक्क्युलम बाद झाल्यावरही स्मिथने फटकेबाजीला मुरड घातली नाही. हैदराबादच्या गोलंदाजांवर चौफेर हल्ला कायम ठेवत स्मिथने ४६ चेंडूंत ४ चौकार आणि ५ षटकारांच्या जोरावर ६६ धावा फटकावल्या. ड्वेन स्मिथ बाद झाल्यावर अन्य फलंदाजांनी झटपट तंबूत परतण्याची घाई दर्शवल्याने सामना अंतिम षटकापर्यंत गेला, पण कर्णधार महेंद्रसिंग धोनीने (नाबाद १३) चौकार लगावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी, हैदराबादने नाणेफक जिंकून फलंदाजी स्वीकारत १४५ धावांपर्यंत मजल मारली. बेन हिल्फेन्हॉसने सुरुवातीलाच हैदराबादला धक्के देत त्यांची २ बाद १५ अशी अवस्था केली होती. पण त्यानंतर सलामीवीर आरोन फिंचने संघाला सावरले, त्याने ५ चौकारांच्या मदतीने ४४ धावांची खेळी साकारली. तो बाद झाल्यावर डॅरेन सॅमी (नाबाद २३) आणि करण शर्मा (नाबाद १७) यांची अखेरच्या षटकांमध्ये जोरदार फटकेबाजी केल्यामुळे संघाला समाधानकारक धावसंख्या उभारता आली.

संक्षिप्त धावफलक
सनरायजर्स हैदराबाद : २० षटकांत ५ बाद १४५ (आरोन फिंच ४४; बेन हिल्फेन्हॉस २/३२) पराभूत वि. चेन्नई सुपर किंग्ज : १९.३ षटकांत ५ बाद १४६ (ड्वेन स्मिथ ६६, ब्रेन्डन मॅक्क्युलम ४०; भुवनेश्वर कुमार २/२३). सामनावीर : ड्वेन स्मिथ.

चेंडू     ४६
चौकार     ४
षटकार ५
६६

Story img Loader