वेटलिफ्टर लॉरेल हबबार्ड ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारी पहिली ट्रान्सजेंडर खेळाडू ठरणार आहे. महिलांच्या ८७ किलोपेक्षा अधिक वजनी गटात हबबार्ड सहभाग घेईल. न्यूझीलंड ऑलिम्पिक समितीने (एनझेडओसी) आज सोमवारी ही माहिती दिली. ४३ वर्षीय हबबार्डने यापूर्वी २०१३मध्ये पुरुषांच्या वेटलिफ्टिंग इव्हेंटमध्ये भाग घेतला होता. “न्यूझीलंडच्या लोकांनी मला पाठिंबा दिल्याने मी त्यांची आभारी आहे”, असे हबबार्डने सांगितले.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने कोणत्याही ट्रान्सजेंडर खेळाडूला महिला म्हणून स्पर्धा करण्यास परवानगी देणारी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. त्यामुळे २०१५ पासून हबबार्ड ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्यास पात्र ठरली आहे. हबबार्डने २०१७च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक आणि सामोआ येथील २०१९च्या पॅसिफिक क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. तिने २०१८च्या राष्ट्रकुल स्पर्धेत भाग घेतला, परंतु तिला गंभीर दुखापतीला सामोरे जावे लागले.

 

हेही वाचा – सैराट झालं जी..! स्मृती मंधानाचा फोटो पाहून चाहते झाले घायाळ

“तीन वर्षांपूर्वी राष्ट्रकुल स्पर्धेत जेव्हा मला माझ्या हाताला दुखापत झाली, तेव्हा मला सल्ला देण्यात आला की माझी क्रीडा कारकीर्द संपुष्टात येऊ शकते. परंतु आपल्या पाठिंब्याने, तुमच्या प्रोत्साहनाने आणि प्रेमाने मला अंधारापासून दूर ठेवले”, असे हबबार्डने सांगितले.