लंडन : गेली तीन वर्षे दुखापती आणि शस्त्रक्रियांच्या स्वरूपातील असंख्य आव्हानांचा मी सामना करीत आहे. स्पर्धात्मक टेनिसमध्ये झोकात पुनरागमन करण्यासाठी माझे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. परंतु शरीराची क्षमता आणि मर्यादा यांची मला जाणीव होती. याच संकेतांमुळे निवृत्तीचा निर्णय घ्यावा लागला, असे ४१ वर्षीय रॉजर फेडररने गुरुवारी निवृत्तीची घोषणा करताना ‘ट्विटर’वर म्हटले.चाळिशी ओलांडल्यानंतरही दुखापती आणि राफेल नदाल, नोव्हाक जोकोव्हिच यांच्यासह युवा टेनिसपटूंची आव्हाने झुगारत टेनिसक्षेत्रातील आपला दबदबा टिकवून ठेवणाऱ्या फेडररच्या खात्यावर २० ग्रँडस्लॅम जेतेपदे जमा आहेत. जुलै २०२१च्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेनंतर फेडरर गुडघ्यावरील तीन शस्त्रक्रियांमुळे स्पर्धात्मक टेनिसपासून दूर आहे. ‘‘पुढील आठवडय़ात लंडन येथे होणारी लेव्हर चषक स्पर्धा ही कारकीर्दीतील अखेरची स्पर्धा असेल,’’ असे फेडररने सांगितले. अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा संपल्यानंतर चार दिवसांतच स्वित्झर्लंडच्या फेडररने ही घोषणा केली आहे. अमेरिकन स्पर्धेत २३ ग्रँडस्लॅम विजेत्या सेरेना विल्यम्सने निवृत्ती पत्करली होती.

२००३च्या विम्बल्डन जेतेपदानंतर फेडरर नावाचे गारुड टेनिसरसिकांवर राज्य करू लागले. नदाल, जोकोविच, अँडी मरे, अँडी रॉडीक अशा अनेक आव्हानांचा मुकाबला करीत फेडरर यश मिळवत होता. फ्रेंच खुल्या स्पर्धेचे मातीचे (क्ले) कोर्ट असो, विम्बल्डनचे हिरवळीचे (ग्रास) कोर्ट असो किंवा ऑस्ट्रेलियन आणि अमेरिकन ग्रँडस्लॅमचे हार्ड कोर्ट.. फेडररने सर्वच मैदानांवर पराक्रम गाजवला. परंतु २०१०च्या ऑस्ट्रेलियन स्पर्धेच्या जेतेपदानंतर त्याचा आलेख घसरला. क्रमवारीतील स्थानाचीही घसरण सुरू झाली. २०१२चे विम्बल्डन जेतेपद मिळवल्यानंतर गेल्या १० वर्षांत २०१७मधील ऑस्ट्रेलियन आणि विम्बल्डन तर २०१८मधील ऑस्ट्रेलियन ही तीनच जेतेपदे त्याने पटकावली. या यशामुळे २०१८मध्ये फेडररने पुन्हा जागतिक क्रमवारीतील अग्रस्थान पटकावले.

दुखापती आणि शस्त्रक्रिया यामुळे फेडररच्या कारकीर्दीचे बरेच नुकसान झाले. परंतु तरीही २०१९मध्ये जेतेपदांचे शतक, १२००वा सामना विजय हे यश फेडररने मिळवले. विम्बल्डनमध्ये त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. २०२०मध्ये ऑस्ट्रेलियन स्पर्धेची उपांत्य फेरी तर २०२१मध्ये विम्बल्डनची उपांत्यपूर्व फेरी तो गाठू शकला.

२०२१च्या विम्बल्डनपासून व्यावसायिक टेनिसपासून दूर असणाऱ्या फेडररची जूनच्या जागतिक क्रमवारीत अव्वल ५० क्रमांकांमधून घसरण झाली आहे. मे २०००नंतर प्रथमच हे त्याच्या कारकीर्दीत घडले. मग ११ जुलैला जाहीर झालेल्या ‘एटीपी’ एकेरीच्या क्रमवारीत २५ वर्षांत (सप्टेंबर १९९७मध्ये पदार्पणानंतर) प्रथमच फेडररला स्थान मिळाले नाही.

ऑल इंग्लंड क्लबच्या सेंटर कोर्टच्या शतकमहोत्सवी कार्यक्रमाला फेडररने जुलैमध्ये हजेरी लावली होती. ‘‘आणखी एकदा विम्बल्डनमध्ये खेळण्यास उत्सुक आहे. ऑक्टोबरमध्ये स्विस इनडोअर स्पर्धेत मैदानावर परतेन,’’ असा विश्वास फेडररने व्यक्त केला होता. याच कोर्टवर जुलै २००१मध्ये उपांत्यपूर्व सामन्यात तो ह्यूबर्ट हुर्काझकडून पराभूत झाला होता.

अद्भुत कारकीर्द. आम्ही तुझ्या टेनिसच्या ‘ब्रँड’च्या प्रेमात पडलो. हळूहळू टेनिसची सवय झाली आणि सवयी कधीच निवृत्त होत नाहीत, त्या आपला एक भाग बनतात. सर्व अविस्मरणीय आठवणींबद्दल धन्यवाद!

-सचिन तेंडुलकर

प्रिय रॉजर, माझा मित्र आणि प्रतिस्पर्धी. हा दिवस कधीच येऊ नये अशी माझी इच्छा आहे. वैयक्तिकरीत्या माझ्यासाठी आणि जगभरातील खेळांसाठी हा दु:खद दिवस आहे. कोर्टात आणि बाहेर असे अनेक आश्चर्यकारक क्षण जगून, ही सर्व वर्षे तुझ्यासोबत व्यतीत करणे ही आनंदाचीच गोष्ट आहे!

-राफेल नदाल

रॉजर माझ्या आदर्श व्यक्तींपैकी तू एक आहेस. तुझ्या टेनिस खेळातील कर्तृत्वासाठी धन्यवाद. मला अजूनही तुझ्याबरोबर खेळायचे आहे. आगामी वाटचालीसाठी तुला शुभेच्छा!

-कार्लोस अल्कराझ

Story img Loader