भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या राजीनाम्यानंतर, बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीमधील सदस्या डायना एडुलजी यांच्या ई-मेलमुळे नवीन गौप्यस्फोट केला आहे. ESPNCricinfo या संकेतस्थळाने यासंदर्भातलं वृत्त प्रसारित केलं आहे, यानुसार अनिल कुंबळेंची गच्छंती होण्यामागे विराट कोहलीचा हात असल्याचं एडुलजी यांनी म्हटलं आहे. अनिल कुंबळे यांच्या जागी रवी शास्त्रींची नेमणूक करताना बीसीसीआयने अनेक नियम पायदळी तुडवल्याचंही एडुलजी यांचं म्हणणं आहे.
अवश्य वाचा – विराट कोहली आणि हरमनप्रीत कौर यांच्यात भेदभाव का? – डायना एडुलजी
महिला टी-२० विश्वचषकादरम्यान प्रशिक्षक रमेश पोवार आणि मिताली राज यांच्यात झालेल्या वादावरुन सध्या एडुलजी आणि प्रशासकीय समितीच प्रमुख विनोद राय यांच्यातले अनेक मतभेद प्रसारमाध्यमांसमोर आले आहेत. प्रशिक्षक निवडीसाठी स्थापन करण्यात आलेली त्रिसदस्यीस समिती आपल्याला विचारात न घेता स्थापन करण्यात आल्याचं एडुलजी यांनी म्हटलं होतं. जर कर्णधार हरमनप्रीत कौर आणि उप-कर्णधार स्मृती मंधाना यांनी रमेश पोवार यांना पुन्हा संधी देण्याची मागणी केली असेल तर त्यांचा विचार का केला जात नाही, एडुलजी यांच्या प्रश्नाला विनोद राय यांनी प्रशिक्षक निवडीच्या प्रक्रीयेत खेळाडू आपलं मत मांडू शकत नाही असं उत्तर दिलं होतं.
यावर प्रत्युत्तर देताना एडुलजी यांनी अनिल कुंबळे यांच्या गच्छंतीमध्ये विराट कोहलीचा कसा हात होता हे सांगितलं आहे. “कोहलीने बीसीसीआयने सीईओ राहुल जोहरी यांना अनिल कुंबळे यांना प्रशिक्षकपदावरुन हटवा अशी मागणी करणारे सात संदेश पाठवले होते. प्रशासकीय समितीने नकार देऊनही विराटला अनिल कुंबळे प्रशिक्षक म्हणून नको होते, त्यावेळी बीसीसीआय विराटच्या मागणीसमोर झुकलं. मग हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधाना रमेश पोवार यांनाच पुन्हा संधी देण्याची मागणी करत असतील तर याच चूक काय?? त्यांनी आपल्या मनातली खरी भावना समोर बोलून दाखवली आहे.” एडुलजी यांनी राय यांना आपल्या ई-मेल मध्ये हा सवाल विचारला आहे.
यावेळी एडुलजी यांनी रवी शास्त्री यांच्या नियुक्तीच्या वेळी नियम कसे तोडले गेले हे देखील सांगितलं आहे. विराटला हव्या असलेल्या उमेदवाराने अर्ज करावा यासाठी मुदत वाढवण्यात आली. या गोष्टीसाठी मी विरोध केला होता. कुंबळे हे दिग्गज खेळाडू आहेत, मात्र त्यादरम्यान परिस्थिती अशी निर्माण करण्यात आली की अनिल कुंबळे खलनायकाच्या भूमिकेत दिसायला लागले. मात्र, एक खेळाडू म्हणून अनिल कुंबळेंबद्दल आपल्या मनात आदर असल्याचं एडुलजी म्हणाल्या.
अवश्य वाचा – IND vs AUS : इतर कर्णधारांप्रमाणे विराटही चूक करतोय – इयान चॅपल