नाव- लिएण्डर पेस. अ‍ॅटलांटा ऑलिम्पिकमध्ये एकेरीत कांस्यपदक. मिश्र आणि पुरुष दुहेरीची एकत्रित अशी नावावर १८ ग्रँड स्लॅम जेतेपदे. डेव्हिस चषकात भारताच्या विजयाचा हुकमी एक्का. पुरुष दुहेरीत १०७, तर मिश्र दुहेरीत २४ सहकाऱ्यांसह खेळण्याचा अनोखा विक्रम. वीस वर्षांहून अधिक कालावधीच्या कारकीर्दीत जपलेले जिंकण्यातले सातत्य आणि तंदुरुस्ती अवाक करणारे आहे. गेले वर्षभर वैयक्तिक आयुष्यात कटू प्रसंगाना सामोरे जात असतानाही ग्रँड स्लॅम जेतेपदांवर कब्जा. दोन दशकांपेक्षा अधिक काळ आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा झेंडा अभिमानाने फडकवणाऱ्या पेसने खेलरत्न, अर्जुन, पद्मश्री आणि पद्मभूषण अशा चारही प्रतिष्ठेच्या सन्मानांवर नाव कोरले आहे. अशा या दिग्गज खेळाडूसह खेळण्याची इच्छा अनेकांना असणे स्वाभाविक. मात्र प्रत्यक्षात चित्र उलटे आहे.
चार वर्षांपूर्वी लंडन ऑलिम्पिककरिता भारतीय टेनिस संघाची निवड होणार होती. पेसला त्याचा यशस्वी सहकारी महेश भूपतीसह खेळण्याची इच्छा होती. महेशला रोहन बोपण्णाबरोबर खेळायचे होते. सानिया मिर्झाला सहकारी निवडण्याचे स्वातंत्र्य हवे होते. यामध्येही तिची पसंती रोहन किंवा महेशलाच होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर एकमेकांचे सहकारी असलेले आणि भारताला असंख्य जेतेपदे मिळवून देणाऱ्या महेश आणि लिएण्डर यांनी एकमेकांवर यथेच्छ शाब्दिक चिखलफेक केली. पेससह खेळण्याची सक्ती केल्याने सानियानेही जोरदार टीका केली. ऑलिम्पिकसाठी संघ निवडण्याचे काम अखिल भारतीय टेनिस संघटनेचे (आयटा). मात्र खेळाडूंचे क्रमवारीतील स्थान, त्यावरून ठरणाऱ्या गोष्टी यावर नियंत्रण आंतरराष्ट्रीय टेनिस संघटनेचे. यात भर म्हणून आयटामध्ये असणाऱ्या अंतर्गत बंडाळ्या. भारतीय टेनिसची या प्रकरणाने पुरती नाचक्की झाली. निवडीवरूनच एवढा कलगीतुरा रंगल्याने साहजिकच ऑलिम्पिकमध्ये टेनिस प्रकारात भारताच्या हाती काहीच लागले नाही.
चार वर्षे सरली. जागतिक क्रमवारीत अव्वल दहामध्ये असल्याने रोहन बोपण्णाला रिओ ऑलिम्पिकमध्ये सहकारी निवडण्याची संधी मिळाली. त्याने साकेत मायनेनीच्या नावाला पसंती दिली. सानिया मिर्झानेही रोहनच्या नावाला प्राधान्य दिले. दुसरीकडे पेस विक्रमी सातवी ऑलिम्पिकवारी करण्यासाठी सज्ज आहे. मार्टिना हिंगिसबरोबर फ्रेंच खुल्या स्पर्धेत जेतेपदासह त्याने फॉर्म आणि तंदुरुस्ती सिद्ध केली. मात्र तरीही पेस कोणालाच नकोय. याचे बीज इतिहासात आहे.
टेनिस वर्तुळात पेसच्या दृष्टिकोनाविषयी आक्षेप आहे. स्वत:पुरता विचार करणारा खेळाडू अशी टीका त्याच्या नावावर होते. आपलेच म्हणणे खरे करून दाखवण्याची त्याची सवय आहे. आयटाचे अध्यक्ष अनिल खन्ना आणि पेस यांच्यातील सलगीमुळे डेव्हिस चषकासाठी खेळाडू निवडणे, खेळाडूंचा क्रम ठरवणे या गोष्टी पेसच ठरवत असे. प्रदीर्घ काळ या वर्तुळात वावरत असल्याने पेसचा शब्द मोडणे किंवा त्याच्याविरुद्ध जाणे कठीण होते. मात्र भारतीय टेनिसमधल्या महेश भूपतीनामक समांतर सत्ताकेंद्रामुळे पेसला आव्हान मिळाले. या दोघांच्यातल्या बेबनावामुळे अन्य खेळाडूंना दोघांपैकी एकाची बाजू घेणे भाग पडले. भूपती आणि बोपण्णा दक्षिण भारतातले आहेत. खेळाडू म्हणून एकत्र येतानाच या दोघांची मैत्रीही घट्ट झाली आहे. सानिया मिर्झा केवळ १५ वर्षांची असताना भूपतीच्या ग्लोबोस्पोर्ट कंपनीने तिच्याशी करार केला. त्यानंतर अनेक वर्षे हीच कंपनी सानियाचे व्यवस्थापन पाहत होती. महेशचे वडील-कृष्णा भूपती यांनी असंख्य युवा खेळाडूंना घडवले आहे. महेश स्वत:च्या अकादमीच्या माध्यमातून आता आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या असंख्य युवा भारतीय खेळाडूंशी निगडित आहे. गेल्यावर्षी विम्बल्डन स्पर्धेत कनिष्ठ गटात दुहेरी प्रकारात जेतेपदावर नाव कोरणारा सुमीत नागल हा महेशचाच शिष्य. स्थानिक स्पर्धेदरम्यान सुमीतची प्रतिभा महेशने हेरली आणि त्याला अकादमीत दाखल करून घेतले. अशाप्रकारे केवळ वरिष्ठ अव्वल खेळाडू तसेच व्यावहारिक समीकरणांसह महेश संलग्न आहे.
पेस आणि भूपती दोघांचाही दबावगट आहे. समर्थक आहेत आणि विरोधकही आहेत. लंडनप्रमाणेच रिओवारीसाठी रोहन आणि सानिया ही भूपती गटाची माणसे एकत्र आल्याने पेसला नकार मिळाला. मात्र यंदा आयटाने बोपण्णाला पेससह खेळण्यास भाग पाडले आहे. मात्र हे सक्तीचे खेळणे भारताला पदक मिळवून देणार का याबद्दल शंकाच राहील. दुसरीकडे सानियाच्याच हैदराबाद येथील अकादमीत सराव करणारी प्रार्थना ठोंबरे सानियासह महिला दुहेरीत खेळणार आहे. त्यामुळे यंदा सानियाची मर्जी राखण्यात आली आहे. टेनिस हा वैयक्तिक स्वरूपाचा खेळ आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दुहेरीचे टेनिसपटू कोणासह खेळायचे याचा निर्णय स्वत: घेतात. यामध्ये राष्ट्रीय संघटनेची भूमिका नसते. परंतु ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेवेळी राष्ट्रीय संघटना संघनिवड करते. म्हणूनच एरव्ही वैयक्तिक हितासाठी आणि या स्पर्धेसाठी राष्ट्रहिताचा विचार करायचा असा गोंधळ उडतो. युवा खेळाडूंची तगडी फौज तयार झाल्यास पेस-भूपती सत्ताकेंद्रे आणि त्याच्या अंतर्गत चालणारे वाद कायमसाठी बंद होतील. परंतु वर्षांनुवर्षे पेस, भूपती, बोपण्णा, मिर्झा या नावांभोवतीच भारतीय टेनिस फिरते आहे. या चौघांनी संघटनात्मक पाठबळ नसताना घेतलेली भरारी कौतुकास्पद आहे. मात्र मोठे होतानाच समकालीन खेळाडूंसोबतचे संबंध नीट राहतील याची दक्षता चौघांनी घ्यायला हवी होती. अन्यथा एकही ग्रँडस्लॅम न जिंकलेला रोहन तब्बल अठरा ग्रँड स्लॅम जेतेपदांसह ऑलिम्पिक पदक नावावर असणाऱ्या पेसला नाकारतोय हे दुर्दैवी चित्र आणखी चार वर्षांनंतरही कायम असेल.

पराग फाटक
parag.phatak@expressindia.com

Story img Loader