कारकीर्दीत सलग सातव्यांदा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत प्रतिनिधित्व करता यावे यासाठी लिएण्डर पेसला मिश्रदुहेरीच्या लढतींवर पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे.

बोपण्णाने रिओचे तिकीट निश्चित केले असून दुहेरीत त्याला खेळण्याची संधी मिळाली आहे. दुहेरीतील साथीदार निवडण्याचा त्याला हक्क आहे. पेसला कारकीर्दीतील अखेरच्या ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्याची संधी द्यावी, यासाठी अखिल भारतीय टेनिस महासंघाकडून बोपण्णाने पेसबरोबर खेळावे असे दडपण आणले जाण्याची शक्यता आहे. पेसने भारताला ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवून दिले आहे व तो ऑलिम्पिकमध्ये उच्च दर्जाचा खेळ करतो, असा आजपर्यंतचा अनुभव असल्यामुळे महासंघ त्याच्यासाठी आग्रही आहे.

सानिया मिर्झाच्या साथीत मिश्रदुहेरीत खेळण्यासाठी पेस उत्सुक आहे. मात्र देशात अव्वल मानांकनात फारसे खेळाडू नसल्यामुळे पुरुषांच्या दुहेरीत केवळ एकच जोडी पाठविली जाण्याची शक्यता आहे. महासंघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, ‘पेसचे जागतिक क्रमवारीतील मानांकनात घसरण झाली आहे. याचा अर्थ त्याची कामगिरी निराशाजनक आहे असे मानणे अयोग्य आहे. कारण त्याचे जोडीदार अनेक वेळा बदलले गेले आहेत. त्याने फ्रेंच स्पर्धेतील मिश्रदुहेरीत विजेतेपद मिळवीत आपण अजूनही अव्वल दर्जाचे खेळाडू आहोत हे दाखवून दिले आहे.  सानियाने ऑलिम्पिक स्पर्धेतील प्रवेश यापूर्वीच निश्चित केला असून मिश्रदुहेरीत ती प्रतिनिधित्व करणार आहे.  साथीदार कोण असावा हे तिने ठरवायचे आहे.’

Story img Loader