‘राजधानी एक्स्प्रेस’ ही सुसाट वेगाचे प्रतीक आहे. मात्र भारताचा अनुभवी टेनिसपटू लिएण्डर पेसचे बॉलीवूड पदार्पण असलेल्या ‘राजधानी एक्स्प्रेस’ चित्रपटामुळे टेनिस मात्र वाऱ्यावर पडले आहे, असेच चित्र आहे. कारकीर्दीच्या उत्तरार्धात असणाऱ्या पेसने चित्रपटात नशीब अजमावण्याचा निर्णय घेतला. मात्र चित्रपट प्रदर्शित होण्याचा दिवस आणि चेन्नई टेनिस स्पर्धा एकाचवेळी आल्याने प्राधान्य कोणाला द्यायचे, हा प्रश्न त्याच्यासमोर होता. पेसने टेनिसच्या ऐवजी चित्रपटाची निवड केली आणि परिणाम व्हायचा तो झालाच. पहिला चित्रपट.. त्याला कसा प्रतिसाद असेल.. चित्रपट गल्ला जमवणार का? या विचारांत अडकलेल्या पेसला पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला.
 गेली अनेक वर्षे टेनिसमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा झेंडा समर्थपणे फडकावणाऱ्या पेसचा घरच्या मैदानावर असा पराभव होताना बघणे, त्याच्या सच्च्या चाहत्यांसाठी क्लेशदायक ठरले.
सराव, डावपेच, प्रतिस्पध्र्याचा अभ्यास याऐवजी चित्रपटाच्या प्रमोशनला प्राधान्य मिळाले. चेन्नई टेनिस स्पर्धेच्या निमित्तानेही चित्रपटाचे प्रमोशन करण्यात आले. मात्र पेस ज्यासाठी ओळखला जातो त्या टेनिसचे मात्र प्रमोशन झालेच नाही. भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर दुहेरीचा सर्वोत्तम खेळाडू अशी लिएण्डर पेसची ओळख आहे. दुहेरीत त्याच्या नावावर असलेली १३ ग्रँडस्लॅम जेतेपदे त्याचीच साक्ष देतात.
कारकीर्दीच्या अंतिम टप्प्यात घरच्या मैदानावर, प्रेक्षकांच्या प्रचंड पाठिंब्यात पेसने तडफदार प्रदर्शन केले असते तर ते त्याच्या प्रतिष्ठेला साजेसे ठरले असते. मात्र घडले भलतेच..
नवनव्या साथीदारांसह खेळण्याची सवय असलेल्या पेसने कारकीर्दीतल्या ९२व्या साथीदारासह खेळण्याचा निर्णय घेतला. मात्र एड्वर्ड रॉजर-वॅसेलिनसह खेळताना ‘पेस एक्स्प्रेस’ पहिल्याच फेरीत घसरली. खेळ सोडून अन्य क्षेत्राकडे वळण्यात काहीही गैर नाही. मात्र या नादात खेळाकडे दुर्लक्ष व्हायला नको. तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेली सानिया मिर्झा एका खाजगी वाहिनीवरील नृत्याच्या कार्यक्रमात सहभागी झाली आहे. ब्रिस्बेन टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीच्या जेतेपदाला सानियाने गवसणी घातली तरी टेनिसपेक्षा ग्लॅमरकडेच सानियाचा कल असतो. पेसचे बॉलीवूड पदार्पण जेतेपदाच्या साथीने झाले असते तर ते त्याच्या चाहत्यांना अधिक सुखावणारे असते.