लिएण्डर पेस आणि रॅडिक स्टेपानेक या जोडीने महेश भूपती-रोहन बोपण्णा जोडीवर मात करत शांघाय मास्टर्स टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले. यंदाच्या हंगामातील तिसऱ्या जेतेपदाची कमाई करताना पेस-स्टेपनेकने ६-७ (७), ६-३, १०-५ अशा फरकाने विजय मिळवला.
लंडन ऑलिम्पिकसाठी भारतीय संघाच्या निवडीप्रसंगी भूपती आणि बोपण्णा यांनी पेससह खेळण्यास नकार दिला होता. भूपती आणि बोपण्णा यांनी सोबत खेळण्याचा हट्टही पुरवण्यात आला होता. मात्र रविवारच्या विजयाने चाळीशीकडे झुकलेल्या बुजूर्ग पेसने भारताचा दुहेरीतील सर्वोत्तम खेळाडू कोण? हे सिद्ध केले. या विजयासह भूपती-बोपण्णा जोडीला पेसने सणसणीत चपराक लगावली आहे.
एक तास ३६ मिनिटे चाललेल्या या लढतीत पेस-स्टेपानेक जोडीने पाचपैकी चार ब्रेकपॉइंट्स वाचवले आणि भूपती-बोपण्णाची सव्‍‌र्हिस दोन वेळा भेदत जेतेपदावर नाव कोरले. पहिल्या सेटमध्ये भूपती-बोपण्णाने वर्चस्व राखले, तर दुसऱ्या सेटमध्ये पेस-स्टेपानेकने सहज सरशी साधली. निर्णायक आणि तिसऱ्या सेटमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. मात्र अनुभव हाच सर्वोत्तम गुरू असल्याचा प्रत्यय देत पेस-स्टेपानेकने तिसऱ्या सेटसह सामना जिंकला.
‘‘तीन भारतीयांसाठी हा भावनात्मक स्वरूपाचा सामना होता. रॅडिकने माझ्यावरील दडपण कमी केले. शांत राहा आणि जिंकण्याची भूक विसरू नकोस, असा सल्ला रॅडिकने मला दिला होता आणि तो मी तंतोतंत पाळला,’’ असे पेसने सांगितले. यंदाच्या हंगामापासून पेस-स्टेपानेक जोडीने पुन्हा एकत्र खेळायला सुरुवात केली होती. ऑस्ट्रेलियन खुली स्पर्धा, मियामी मास्टर्स आणि शांघाय मास्टर्सचे जेतेपद कमावत या जोडीने दमदार प्रदर्शन केले. ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या जेतेपदासह आम्ही सुरुवात चांगली केली आणि त्यानंतर सातत्याने चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला.
आम्हाला मिळालेले यश हे त्याचेच द्योतक असल्याचे पेसने सांगितले. या जोडीने वर्षअखेरीस होणाऱ्या वल्र्ड टूर फायनल्समध्ये स्थान पटकावले आहे.

Story img Loader