अनुभवाची खाण असलेल्या लिएण्डर पेसने पुरव राजाच्या साथीने ‘करो या मरो’ स्थिती असलेली दक्षिण कोरियाविरुद्धची दुहेरीची लढत जिंकून डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेच्या आशिया-ओशियाना गट-१ मधील भारताच्या आशा कायम राखल्या आहेत. मात्र पराभवाची नामुष्की टाळण्यासाठी भारताला रविवारी परतीच्या एकेरी लढतीत चमकदार कामगिरी करावी लागणार आहे.
पहिल्यांदाच एकत्र खेळणाऱ्या पेस-राजा जोडीने कोरियाच्य योंग-क्यू लिम आणि जी संग नॅम या जोडीचा ६-४, ७-५, ६-२ असा पराभव करून भारताला पहिला विजय मिळवून दिला. कोरियाने पहिल्या दिवशी एकेरीचे दोन्ही सामने जिंकल्यामुळे २-१ अशा स्थितीतून परतीच्या एकेरीतील उर्वरित दोन्ही सामने जिंकण्याचे आव्हान भारताच्या व्ही. एम. रणजीत आणि विजयांत मलिक यांच्यासमोर असेल. रणजीतचा सामना मिन येओक चो याच्याशी होईल, तर मलिकला सक-यंग जेओंग याच्याशी लढत द्यावी लागेल.
कोरियाच्या तंदुरुस्त टेनिसपटूंसमोर लढताना पेस-राजा जोडीची कसोटी लागली. सुरुवातीच्या गेममध्ये पेस-जोडीने चार ब्रेकपॉइंट वाचवले. राजाच्या खेळातील मर्यादा स्पष्ट झाल्या असल्या तरी पदार्पणाच्या सामन्यात त्याने पेसला चांगली साथ दिली. दर्जेदार खेळ करण्यापेक्षा त्याने भारताच्या विजयात मोलाचे योगदान देण्यावर भर दिला. वय वाढल्याचा परिणाम पेसच्या खेळावर दिसत असला तरी त्याचा अनुभव कोरियावर विजय मिळवण्यात फायदेशीर ठरला. पहिल्यांदाच भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या साथीदारासह खेळताना पेसने सहा महिन्यांत दुसऱ्यांदा चांगली कामगिरी साकारली. लंडन ऑलिम्पिकमध्ये त्याने विष्णू वर्धनसह सुरेख कामगिरी केली होती.
पहिल्या सेटमधील सहाव्या गेममध्ये पेस-राजा जोडीला प्रतिस्पध्र्याची सव्‍‌र्हिस भेदण्याची संधी मिळाली होती, पण लिमने शांत डोक्याने सव्‍‌र्हिस करत हा गेम आपल्या नावावर केला. राजाच्या फटक्यांमध्ये ताकद आणि सातत्याचा अभाव असल्यामुळे सातव्या गेममध्ये त्याची सव्‍‌र्हिस मोडीत काढून कोरियाने ४-४ अशी बरोबरी साधली, पण लिमची दुसऱ्यांदा सव्‍‌र्हिस भेदत भारताने पहिला सेट जिंकला. राजाने खेळात सुधारणा केली, त्याचप्रमाणे कोरियानेही सुरेख खेळ करत दुसरा सेट ट्रायब्रेकरमध्ये नेला. पेस-राजा जोडीने आपल्या अनुभवाच्या जोरावर दुसऱ्यासह तिसरा सेट जिंकून भारताच्या विजयावर मोहोर उमटवली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा