भारताच्या लिएण्डर पेस व रोहन बोपण्णा यांनी आपल्या जोडीदारांसमवेत पुरुष दुहेरीची विजेतेपदे मिळवण्याची किमया साधताना आगामी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पाश्र्वभूमीवर टेनिसजगतात सावधतेचा इशारा दिला आहे. सानिया मिझाने बेथानी मॅटेक-सँड्सच्या साथीने शुक्रवारी महिला दुहेरीचे जेतेपद जिंकल्यानंतर शनिवारी पेस आणि बोपण्णा यांनी ही यशोमालिका कायम राखली आहे.
पेसने ऑकलंडमधील हेन्केन चषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा रावेन क्लासेन याच्या साथीने खेळताना प्रथमच विजेतेपद मिळवले. या जोडीने चौथ्या मानांकित डॉमिनिक इंग्लोट व फ्लोरियन मेर्जिया यांचा ७-६ (७-१), ६-४ असा पराभव केला. पेसचे हे कारकिर्दीतील ५५वे जेतेपद आहे. य्बोपण्णाने कॅनडाच्या डॅनियल नेस्टॉरसोबत सिडनी येथील एपिया आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अजिंक्यपद मिळवले. त्यांनी द्वितीय मानांकित जीन ज्युलियन रॉजर व होरीउ तेकायु यांच्यावर ६-४, ७-६ (७-५) असा संघर्षपूर्ण विजय मिळविला.

Story img Loader