आशियाई स्पर्धेतून माघार घेण्याबाबत लिएंडर पेस, रोहन बोपण्णा व सानिया मिर्झा यांना अखिल भारतीय टेनिस महासंघाने सवलत दिली आहे. त्यामुळे या खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय मानांकन स्पर्धामध्ये भाग घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आशियाई स्पर्धेऐवजी पोटापाण्यासाठी व्यावसायिक स्पर्धा अधिक महत्त्वाच्या असल्याचे मत व्यक्त करत पेसने आशियाई स्पर्धेतील माघार घेण्याचे समर्थन केले होते. या तीन खेळाडूंपूर्वी सोमदेव देववर्मननेही आशियाई स्पर्धेत सहभागी होणे शक्य नसल्याचे कळविले होते. टेनिस महासंघाने खेळाडूंच्या निर्णयाशी सहमती दर्शविली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आम्ही खेळाडूंची विनंती मान्य करीत असून त्यांना आशियाई स्पर्धेऐवजी मानांकन स्पर्धामध्ये भाग घेण्यास परवानगी दिली आहे.
रोजीरोटीचा प्रश्न असल्यामुळे व्यावसायिक टेनिसपटुंसाठी प्रत्येक मानांकन स्पर्धा महत्त्वाची असत, असे पेसने सांगितले आहे.