अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीचे जेतेपद राखू न शकणाऱ्या लिएण्डर पेसची जागतिक क्रमवारीत मोठी घसरण झाली आहे. लिएण्डरची २३ स्थानांनी घसरण होऊन तो ३५व्या स्थानी फेकला गेला आहे. गेल्या अकरा वर्षांतली पेसची क्रमवारीतील ही सगळ्यात मोठी घसरण आहे. लिएण्डर चेक प्रजासत्ताकच्या राडेक स्टेपानेकच्या साथीने खेळत आहे. यंदा या जोडीला प्राथमिक फेरीतच पराभवाचा सामना करावा लागला. जानेवारी २००३ मध्ये पेस जागतिक क्रमवारीत ३८व्या स्थानी होता; मात्र गेल्या काही वर्षांत सातत्यपूर्ण प्रदर्शनाच्या जोरावर त्याने अव्वल वीसमध्ये स्थान कायम राखले आहे. दरम्यान, सर्बियाविरुद्धच्या डेव्हिस चषक लढतीत पेसच्या साथीने खेळणार असलेल्या रोहन बोपण्णाने क्रमवारीत दोन स्थानांनी आगेकूच केली आहे. एकेरी प्रकारात सोमदेवची १४४व्या स्थानी घसरण झाली आहे. दरम्यान, महिला दुहेरीत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या सानिया मिर्झाची दोन स्थानांनी घसरण होऊन ती सातव्या स्थानी स्थिरावली आहे. सानिया-कॅरा जोडी चौथ्या स्थानी आहे. वर्षअखेरीस होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल आठ जोडय़ांना खेळण्याची संधी मिळते. त्या दृष्टीने सानिया-कॅरा जोडीने दमदार आगेकूच राखली आहे.

Story img Loader