लिएण्डर पेस हा दुहेरी प्रकारातला भारताचा हुकुमी एक्का. पेसच्या बळावरच भारताने डेव्हिस चषकात दिमाखदार कामगिरी केली आहे. मात्र पेसच्या आयुष्यातील वैयक्तिक लढाईचा परिणाम भारतीय टेनिसवर होण्याची चिन्हे आहेत.
वैयक्तिक कारणांमुळे पेसने यंदाच्या हंगामात भारतीय संघासाठी खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट केले होते. या अडचणीतून सुटका करत पेसने आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले. मात्र मुलीचा ताबा मिळवण्यावरून पत्नी रियाशी सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीला हजर राहायचे असल्याने पेसने डेव्हिस चषकातून माघार घेतली आहे. बंगळुरू येथे १२ ते १४ सप्टेंबर या कालावधीत भारताचा सर्बियाविरुद्ध मुकाबला होणार आहे. सर्बियासारख्या मातब्बर संघाला टक्कर देण्यासाठी भारताला पेसची नितांत आवश्यकता होती. मात्र वैयक्तिक कारणांमुळे भारताला पेसविनाच लढावे लागणार आहे.
‘‘लिएण्डर आशियाई क्रीडा स्पर्धा खेळणार आहे. डेव्हिस चषकातही त्याची खेळण्याची मनापासून इच्छा होती. मात्र वैयक्तिक कारणास्तव त्याने माघार घेण्याचा निर्णय घेतला.
डेव्हिस चषकासाठीच्या संघनिवडीत माझ्या नावाचा विचार करू नये अशी विनंती त्याने केली. अखिल भारतीय टेनिस संघटनेने त्याच्या विनंतीला मान देत त्याचा भारतीय संघात समावेश केलेला नाही,’’ असे महासचिव भरत ओझा यांनी स्पष्ट केले.
वैयक्तिक कारणांमुळेच यंदाच्या वर्षांत झालेल्या चायनीज तैपेई आणि कोरियाविरुद्धच्या डेव्हिस चषक लढतीत पेस खेळू शकला नव्हता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा