नवी दिल्ली : जकार्ता येथे होणाऱ्या आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेतील सांघिक लढतींसाठी रामकुमार रामनाथनला वरिष्ठ व अनुभवी खेळाडू लिएण्डर पेसच्या साथीने खेळवले जाण्याची शक्यता आहे, असे भारतीय संघाचे न खेळणारे कर्णधार झीशान अली यांनी सांगितले.

या स्पर्धेसाठी पूर्वनियोजनानुसार रोहन बोपण्णा हा दिविज शरणच्या साथीने, तर पेस हा सुमीत नागलच्या साथीने खेळणार असल्याचे ठरवण्यात आले होते; परंतु न्यूपोर्ट येथील एटीपी स्पर्धेत स्टीव्ह जॉन्सनसोबत रामकुमारने उपविजेतेपद मिळवले. त्यामुळे रामकुमारने पेसच्या साथीने भारतास आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक मिळवण्याबाबत आत्मविश्वास व्यक्त केला. त्याप्रमाणे त्याने झीशान यांना विनंतीही केली आहे.

याबाबत झीशान म्हणाले, ‘‘मी संघातील सर्व खेळाडूंबरोबर सविस्तर चर्चा करूनच अंतिम निर्णय घेणार आहे. रामकुमार व पेस हे यापूर्वी पुणे चॅलेंजर स्पर्धेत एकत्र खेळले होते. या स्पर्धेत त्यांनी उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल गाठली होती. त्यांना एकमेकांच्या खेळाचा अभ्यासही आहे. तसेच पेस हा रामकुमारसाठी आदर्श खेळाडू आहे.’’

आशियाई स्पर्धेत रामकुमार हा एकेरीत खेळणार असून वैयक्तिक दुहेरीत तो प्रज्ञेश गुणेश्वरन याच्या साथीने उतरणार आहे. नागलला संघातील अतिरिक्त खेळाडू म्हणून स्थान देण्यात आले आहे. मात्र दुहेरीतील विष्णू वर्धन, एन. श्रीराम बालाजी, जीवन नेदूंचेझियन यांनी नागलला दुहेरीत स्थान देण्याबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यामुळेच झीशान हे पेसच्या साथीने रामकुमारला खेळवण्याबाबत राजी झाले आहेत.

पेसने आतापर्यंत आशियाई क्रीडा स्पर्धेत पाच सुवर्णपदकांसह आठ पदकांची कमाई केली आहे.

Story img Loader