महाराष्ट्राची टेनिसपटू प्रार्थना ठोंबरे हिची रिओ ऑलम्पिकसाठी निवड करण्यात आली आहे. प्रार्थना सानिया मिर्झासोबत महिला दुहेरीत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. सानिया मिर्झाने प्रार्थना ठोंबरेच्या नावाला पसंती दिल्यानंतर तिची निवड करण्यात आली आहे. रिओ ऑलम्पिकसाठी अखिल भारतीय टेनिस संघटनेने (एआयटीए) शनिवारी भारतीय संघाची घोषणा केली. यामध्ये पुरूष दुहेरीत रोहन बोपण्णाच्या साथीला अनुभवी टेनिसपटू लिएंडर पेस तर महिला दुहेरीत भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झाच्या जोडीला मराठमोळी प्रार्थना ठोंबरे हिची निवड करण्यात आली आहे. मिश्र दुहेरीत सानिया मिर्झाच्या जोडीला रोहन बोपण्णा असणार आहे.
दरम्यान, प्रार्थना ठोंबरेची निवड झाल्याची बातमी समजल्यानंतर सोलापूरमधील बार्शी या तिच्या गावात जल्लोषाचे वातावरण आहे. २१ वर्षीय प्रार्थनाने आजवर आयटीएफ स्पर्धांमध्ये एकेरीत पाच तर दुहेरीत दहा विजेतेपदे मिळवली आहेत. २०१४साली इन्चिऑन इथे झालेल्या आशियाई क्रीडास्पर्धेत प्रार्थनानं सानियाच्या साथीने कांस्यपदक मिळवले होते. सानियानंतर दुहेरीत भारतीय खेळाडूंमध्ये ती दुसरी आहे. जागतिक क्रमवारीत ती २०९ व्या स्थानावर आहे. प्रार्थना हैदराबादमधील सानिया मिर्झाच्या अॅकॅडमीत सानियाचे वडील इम्रान यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.