लिएण्डर पेस आणि महेश भूपती या जोडीनेच अनेक वर्ष आंतरराष्ट्रीय स्तरावर दुहेरी प्रकारात भारताचा झेंडा अभिमानाने फडकत ठेवला. मात्र या दोघांमधल्या कलगीतुऱ्याने भारतीय टेनिसची अपरिमित हानी झाली. लंडन ऑलिम्पिकपूर्वी या दोघांनी एकमेकांवर केलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या द्वंद्वामुळे जागतिक स्तरावर भारताची नाचक्की झाली आणि पदकाची शक्यताही दुरावली. भारतीयांना अभिमानास्पद वाटेल अशी कामगिरी करणारे एकेकाळचे जिगरी दोस्त वैरी झाले. मात्र पैसा माणसांना जोडण्याची किमया करू शकतो याचा प्रत्यय या दोघांनी दिला आहे. वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवत लिएण्डर पेस महेश भूपती निर्मित्त इंडियन टेनिस प्रीमिअर लीग स्पर्धेत खेळणार आहे.
रॉजर फेडरर, नोव्हाक जोकोव्हिच, पीट सॅम्प्रस यांच्यासह असंख्य अव्वल टेनिसपटूंचा समावेश असलेला आयपीटीएलचा पहिला हंगाम यशस्वी ठरला. दुसऱ्या हंगामासाठी रविवारी दुबईत लिलाव आयोजित करण्यात आला होता. १९ दिवस रंगणाऱ्या दुसऱ्या हंगामाची सुरुवात २ डिसेंबरला होणार असून, अंतिम लढत २० डिसेंबरला होणार आहे. कॉर्पोरेट क्षेत्राच्या वाढत्या मागणीला मान देत भूपतीने स्पर्धेत पाचव्या हंगामात नव्या फ्रँचाइजीला समाविष्ट केले. दुसऱ्या हंगामात जपान वॉरियर्स हा पाचवा संघ असणार आहे. विशेष म्हणजे ४१ वर्षीय पेस याच संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. पहिल्या हंगामादरम्यान पेस आयपीटीएलमध्ये खेळणार का याविषयी भूपतीला विचारणा करण्यात आली होती. त्यावेळी पेसशी स्पर्धेत खेळण्याविषयी संपर्क करण्यात आला, मात्र त्याने आपण खेळू शकणार नसल्याचे सांगितल्याचे भूपतीने स्पष्ट केले होते. दुसरीकडे आयपीटीएल स्पर्धेतील व्यवहारांची पारदर्शकता आणि शाश्वती याविषयी पेसने साशंकता व्यक्त केली होती. मात्र अवघ्या काही महिन्यांतच पेसने इतिहास बाजूला सारत व्यवहार्य निर्णय घेतला आहे.
दरम्यान इंडियन एसेस संघाने रोहन बोपण्णा आणि सानिया मिर्झा या भारतीय जोडीला आपल्याकडे राखण्यात यश मिळवले. मात्र रॉजर फेडररला त्यांनी गमावले आहे. दुसऱ्या हंगामात फेडरर यूएई रॉयल्स संघाकडून खेळणार आहे. भारतीय चाहत्यांना फेडररऐवजी लढवय्या राफेल नदालचा खेळ पाहण्याची संधी मिळणार आहे. नवीन संघ विकत घेण्यासाठी खर्चलेली रक्कम, लिलावात खेळाडूंना मिळालेली रक्कम याविषयी कोणतीही माहिती आयपीटीएल संयोजकांनी यंदाही दिलेली नाही.
इंडियन टेनिस प्रीमिअर लीगमधील संघ
इंडियन ऐसेस – राफेल नदाल, रोहन बोपण्णा, सानिया मिर्झा, गेएल मॉनफिल्स, अॅग्निेझेस्का रडवानस्का, इव्हान डोडिग, फॅब्रिस सॅन्टोरो.
जपान वॉरियर्स – मारिया शारापोव्हा, लिएण्डर पेस, वेसेक पॉसपसिल, मरात साफीन, डॅनिएला हन्तुचोव्हा, ल्युकास पौली, कुरुमी नरार.
यूएई रॉयल्स – रॉजर फेडरर, टॉमस बर्डीच, अॅना इव्हानोव्हिक, गोरान इव्हानिसेव्हिक, क्रिस्तिना लाडेनेव्हिक, मारिन चिलीच, डॅनिएल नेस्टर.
मनिला मॅव्हरिक्स – सेरेना विल्यम्स, जो विलफ्रेड सोंगा, सबिन लिइस्की, मार्क फिलीपॉयुनिस, जर्मिला गाजाडोसोव्हा, बोरना कोरिक, ट्रेट ह्य़ुे.
सिंगापूर स्लॅमर्स – नोव्हाक जोकोव्हिच, निक कुर्यिगास, कॅरोलिना प्लिसकोव्हा, कालरेस मोया, बेलिंडा बेनकिक, थानासी कोकिनाकीस, मार्केलो मेलो.