सर्बियाविरुद्ध बंगळुरू येथे पुढील आठवडय़ात सुरू होणाऱ्या डेव्हिस चषक टेनिस लढतीत भारताचा अव्वल दर्जाचा खेळाडू लिएण्डर पेस याचा सहभाग निश्चित झाला आहे. तो दुहेरीत रोहन बोपण्णाच्या सोबत खेळणार आहे, अशी माहिती भारतीय संघाचे न खेळणारे कर्णधार आनंद अमृतराज यांनी दिली.
यापूर्वीच्या नियोजनानुसार बोपण्णाच्या साथीने साकेत मिनेनी दुहेरीत खेळणार होता. त्याने चीन तैपेईविरुद्ध झालेल्या लढतीत डेव्हिस स्पर्धेतील पदार्पण केले होते. पेसने सर्बियाविरुद्धच्या लढतीसाठी सहभाग निश्चित केल्यामुळे साकेतला आता राखीव खेळाडूची भूमिका करावी लागणार आहे.
अमृतराज म्हणाले, ‘‘पेसने खेळावे असा आग्रह रोहननेच धरला होता. त्यामुळे आम्ही पेसबरोबर सतत संपर्कात होतो. मी स्वत: पेसशी सविस्तर बोललो आहे व त्याने या लढतीत भाग घेण्याचे मान्यही केले आहे. तसेच मी साकेत याच्याशीही बोललो असून त्यानेही पेसला हा सामना देण्यास होकार दिला आहे.’’
दरम्यान, सर्बियाचा कर्णधार बोगडॅन ओब्राडोव्हिक म्हणाला, ‘‘आमच्या संघात जोकोव्हिच असो किंवा नसो, आम्ही बलाढय़ आहोत. याचप्रमाणे दोन्ही संघांना डेव्हिस चषक जागतिक प्ले-ऑफची लढत जिंकण्याची समान संधी आहे.’’

Story img Loader