अनुभवी टेनिसपटू लिएण्डर पेस आणि खेळाडू म्हणून यशस्वी कारकीदीनंतर प्रशिक्षक म्हणून यशस्वी कारकीर्द घडवणारे बॅडमिंटनपटू पुल्लेला गोपीचंद यांची पद्मभूषण पुरस्कारासाठी निवड झाली आहे. अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगची पद्मश्री पुरस्कारासाठी निवड झाली आहे. युवराजसह दीपिका पल्लिकल (स्क्वॉश), अंजूम चोप्रा (क्रिकेट), सुनील डब्बास (कबड्डी), लव राज सिंग धर्माशक्तू (गिर्यारोहण), एच. बोनीफेस प्रभू (व्हीलचेअर टेनिस), ममता सोधा (गिर्यारोहण) या क्रीडापटूंची पद्मश्री पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेल्या पद्मभूषण पुरस्कारासाठी देशाप्रती अतुलनीय सेवा बजावणाऱ्या व्यक्तींची निवड केली जाते. विशिष्ट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी व्यक्तींना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले जाते. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण केले जाते.
पेसने याआधी राजीव गांधी खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कारावर नाव कोरले होते. गेल्या वर्षी ४०व्या वर्षी पेसने चेक प्रजासत्ताकच्या राडेक स्टेपानेकच्या साथीने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या जेतेपदावर कब्जा केला होता. हे जेतेपद पटकावणारा पेस सर्वाधिक वयाचा खेळाडू ठरला होता. पेसच्या नावावर १४ ग्रँडस्लॅम जेतेपदे असून यामध्ये पुरुष दुहेरीची आठ तर मिश्र दुहेरीच्या सहा जेतेपदांचा समावेश आहे.  
ऑल इंग्लंड बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचे या प्रतिष्ठेचे स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या गोपीचंद यांची कारकीर्द गुडघ्याच्या दुखापतीमुळे अकाली संपुष्टात आली. मात्र अकादमीच्या माध्यमातून त्यांनी शेकडो बॅडमिंटनपटू घडवण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. १९९९ साली गोपीचंद यांना अर्जुन पुरस्काराने तर २००१ मध्ये खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले होते. २००५ मध्ये पद्मश्री तर २००९ मध्ये त्यांना द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवालच्या यशात गोपीचंद यांचा मोठा वाटा आहे. पी. व्ही. सिंधू, पारुपल्ली कश्यप, गुरुसाईदत्त, किदंबी श्रीकांत असे अनेक बॅडमिंटपटू गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली भारतासाठी दमदार कामगिरी करत आहेत.
तडाखेबंद फलंदाज आणि उपयुक्त फिरकी गोलंदाज असणाऱ्या युवराजने भारताला २०११ विश्वचषक मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावली होती. पहिलावहिला ट्वेन्टी-२० विश्वचषक भारताला मिळवून देण्यात युवराजची भूमिका निर्णायक होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा